धुळे - तेल, साखर आदी किराणा साहित्यापाठोपाठ मसाल्यांचे दर वाढल्याने स्वयंपाकाची चव महागली आहे.
मागील काही दिवसांपासून महागाई आकाशाला भिडली आहे. महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सर्वाधिक फटका गृहिणींना बसत असून महिन्याचे आर्थिक बजेट आखताना त्यांची कसरत होऊ लागली आहे. प्रत्येक वस्तू महाग होत असल्याने बचत करायची तरी कुठे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. यापूर्वी तेल, साखर, डाळी, सुकामेवा, भाजीपाला महाग झाला आहे. आता त्यातच महागाईला मसाल्याची फोडणी लाभली आहे. रामपत्री, जावींत्री, नाकेश्वरी आदी मसाले महाग झाले आहेत.
महागाई पाठ सोडेना -
दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. महागाईचा अधिक त्रास गृहिणींना सहन करावा लागतो. आता मसालेदेखील महाग झाले आहेत. स्वयंपाकात मसाल्यांचा वापर टाळू शकत नाही. त्यामुळे त्यांची खरेदी करावीच लागते. महागाईवर नियंत्रण आणले पाहिजे.
- सोनिया जैन, गृहिणी
सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. किराणा साहित्य, भाजीपाला यासोबतच मसालेही महाग झाले आहेत. त्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. तेल, साखर, मसाले यांचे वाढलेले भाव कमी करणे आवश्यक आहे.
- ललिता बोरोले, गृहिणी
म्हणून वाढले मसाल्यांचे दर
केरळ येथून मसाल्यांची जास्त आवक होते. मागील काही महिन्यांपासून मसाल्यांची आवक कमी झाली आहे. रामपात्री, जविंत्री, नाकेशवरी या मसाल्यांचे दर वाढले असून इतर मसाल्याच्या किमती स्थिर आहेत
- महेश शेंडे, व्यावसायिक
अफगाणिस्थान येथून येणाऱ्या मसाले व ड्रायफ्रुट्सचे प्रमाण लक्षणीय आहे. अफगाणिस्थानमध्ये निर्माण झालेल्या संकटामुळे व्यापार बंद झाला आहे. त्याचाही परिणाम दरांवर झाला आहे. दिवाळीपर्यंत दर कमी होण्याची शक्यता नाही.
- सुधाकर पाचपुते, व्यावसायिक