अतुल जोशी
धुळे : गेल्या काही वर्षांपासून कपाशीखालोखाल सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या पिकाला भावही चांगला मिळतो. मात्र, सोयाबीनवर आलेल्या ‘मिली बग’मुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्याच्या स्वप्नांचा पुन्हा एकदा चुराडा झाला आहे.
अनियमित पाऊस, वातावरणातील बदलाचा शेतीला फटका बसू लागला आहे. पीक वाढू लागले की, त्यावर विविध कीडरोगांचाही प्रादुर्भाव होत असतो. यामुळे उत्पन्नात घट येते. तसेच शेतात उत्पन्न आले की, भावही घसरतात. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नाही.
सध्या कपाशीला चांगला भाव मिळतो. त्याखालोखाल आता सोयाबीनला भाव मिळू लागल्याने, शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीकडे कल वाढलेला आहे. मात्र या पिकालाही आता ‘मिली बग’ने ग्रासलेले आहे.
काय आहे मिली बग?
मिली बग हा रस शोषण करणारा किडा आहे. तो कापूस, भेंडी, सोयाबीन आदी पिकांच्या कोवळ्या भागावर बसतो. त्याचा रस शोषत असतो. तसेच द्रव्य बाहेर टाकत असतो. पांढऱ्या रंगाचा हा किडा असून, त्यामुळे पिकांचे नुकसान होते.
मिली बग रोखण्यासाठी ही घ्यावी काळजी
n मिली बग रोखण्यासाठी एक टक्का साबणाच्या द्रावणाची फवारणी करावी. नंतर आंतरप्रवाही औषध फवारल्यास त्यामुळे ही कीड नियंत्रणात येते.
n हे कीड सर्व प्रथम बांधावर आढळून येत असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेताचे बांध स्वच्छ केल्यास या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
पेरणीवर लावलेला पैसा निघतो की नाही?
सोयाबीनला भाव चांगला मिळतो. त्यामुळे त्याची लागवड केली. मात्र, या पिकावरही मिली बगचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने खर्च निघेल की नाही, याची शक्यता कमी वाटते.
-देविदास पाटील,
शेतकरी
कपाशीपाठोपाठ आता सोयाबीनला भाव मिळायला लागला आहे. परंतु आता या पिकालाही किडीने ग्रासलेले आहे. उत्पन्न कसे येईल, हे सांगता येत नाही.
-संजय पाटील
शेतकरी
मिली बगचा भाग कापावा
ज्या भागावर मिली बग आढळून येतो, तो भाग कात्रीने कापून टाकावा. तसेच कापून जमा झालेला कचरा जाळून टाकावा. म्हणजे मिली बगचा आणखी प्रादुर्भाव होऊ शकणार नाही. असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.