बसस्थानकात रात्री पोलीस गस्तीची गरज
धुळे : येथील बसस्थानकात रात्रीही प्रवाशांची बऱ्यापैकी वर्दळ असते. रात्रीच्यावेळी काही गुंड प्रवृत्तीचे लोक वाद घालत असतात. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरत असते. बसस्थानकात सुरक्षा रक्षक आहेत., मात्र त्यांना कोणी जुमानत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी येथे रात्रीही पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे.
नरडाणा उड्डाणपुलावर अपघाताचे प्रमाण वाढले
नरडाणा : गेल्या काही दिवसांपासून येथील उड्डाणपुलावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अपघातात काहींना आपला जीवही गमवावा लागलेला असून, या उड्डाणपुलावर ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याची गरज निर्माण झालेली आहे.
नवनिर्वाचित सदस्यांकडून अपेक्षा वाढल्या
शिंदखेडा : तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या असून, अनेक तरुण चेहरे निवडून आलेले आहेत. तसेच सरपंचपदीही तरुणांना संधी मिळालेली आहे. त्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून गावाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.
दिवाणमाळ-सडगाव रस्त्याची दुरवस्था
धुळे : तालुक्यातील दिवाणमाळ ते सडगाव दरम्यानच्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, त्यावर वाहन चालविणे कठीण झालेले आहे. हा रस्ता अगोदरच रुंद आहे. रस्त्याची रुंदी वाढवून, त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांनी केलेली आहे.
विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याची मागणी
धुळे : कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांना एक गणवेश देण्यात आलेला आहे. मात्र शाळा सुरू नसतील तरी विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे दोन गणवेश देण्याची मागणी आहे.
वणी गावाजवळील पुलाचे काम झाले नाही
धुळे : तालुक्यातील फागणे ते अमळनेरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण व नूतनीकरण नुकतेच झाले. मात्र वणी गावाजवळ असलेल्या पुलाचे काम झाले नसल्याची नागरिकांचीतक्रार असून, हा पूल नव्याने बांधण्याची मागणी आहे.
दिव्यांगाने दिला राम मंदिरासाठी निधी
निमगूळ : शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ येथील किशोर खंडेराव बागल या दिव्यांग तरुणाला ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून ११०० रुपये मिळाले होते. त्याने गावातील राममंदिर बांधकाम समितीला भेटून ही रक्कम दिली. यावेळी खंडू मास्तर, डॅा. वीरेंद्र बागल, किशोर बागल, अनिल बागल, विजय कुवर, सुनील जोशी, संदीप ईशी, उत्तम बागल, व्यंकटेश मिस्तरी, प्रतिक शिरसाठ, सिद्धार्थ बागल, झुंझार बागल, बाळकृष्ण बागल उपस्थित होते.
उड्डाणपुलाखाली अतिक्रमण वाढले
धुळे : शहरातील कृषी महाविद्यालयाजवळ बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली अतिक्रमण वाढू लागले आहे. या पुलाखालीच रिक्षा उभ्या राहतात. त्याचबरोबर काही व्यावसायिकही हातगाड्या लावत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असते.
नवीन वसाहतींमध्ये सुविधांचा अभाव
पिंपळनेर : शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. चहुदिशांनी नवीन वसाहती निर्माण झालेल्या आहेत. मात्र नवीन वसाहतींमध्ये अजूनही सुविधांचा अभाव आहे. गटारी नसल्याने पाणी रस्त्यावरच सोडावे लागत असून येथेही सुविधा देण्याची गरज आहे.