नवनियुक्त स्थायी समिती सभापती संजय जाधव यांनी तत्काळ पदभार स्वीकारत भाजपा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. मनपा स्थायी समिती आणि महिला बालकल्याण समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यासाठी गुरुवारी महापालिकेत जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत निवडप्रक्रिया पार पडली. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे प्रभाग क्रमांक पंधराचे नगरसेवक संजय जाधव यांचा आणि महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी प्रभाग क्रमांक ११ च्या नगरसेविका वंदना विक्रम थोरात यांचा तर उपसभापतीपदासाठी भाजपच्या नगरसेविका शंकुतला जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी झालेल्या निवड सभेत पिठासीन अधिकारी संजय यादव यांनी सभापतींची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. स्थायी समिती सभापती संजय जाधव यांचा खा. डॉ सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, मावळते सभापती सुनील बैसाणे, आयुक्त अजीज शेख आणि भाजपा नगरसेवक, स्थायी समिती सदस्य आणि पदाधिकाऱ्यांंनी सत्कार केला. यावेळी स्थायी समिती सदस्य शीतल नवले, नागसेन बोरसे, बन्सीलाल जाधव, कमलेश देवरे, सईद बेग, अमिन पटेल, मंगला सुरेश पाटील, हिना पठाण, पुष्पा बोरसे, वैशाली वराडे हे उपस्थित होते. तर स्थायी समिती सदस्य अमोल मासुळे, भारती माळी, किरण कुलेवार, मंगला चौधरी हे निवड प्रक्रियेदरम्यान गैरहजर होते.
मनपाच्या जागा ताब्यात घेणार -जाधव
पाच वर्षांपूर्वी विरोधी पक्षनेता असताना मी महापालिकेच्या मालमत्ता, जमिनी कुठे आहेत याचा शोध घेऊन त्याच्या फाईल बाहेर काढल्या होत्या. त्या सर्व मालमत्ता, भूखंड महापालिकेच्या ताब्यात घेऊन मनपाचे उत्पन्न वाढविण्याचा एककलमी कार्यक्रम आपण राबवणार असल्याचे यावेळी नूतन सभापती संजय जाधव यांनी सांगितले. तसेच शहराचा पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी सर्व जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी करुन दैनंदिन पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे भविष्यात नियोजन केले जाईल.