धुळे : तालुक्यातील रावेर येथील रहिवासी व सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथे प्राध्यापक असलेले डॉ. शरद बाविस्कर यांच्या 'भुरा' या आत्मकथनाचे उमविचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक नजूबाई गावित, सिद्धार्थ जगदेव, राजू देसले, संदीप देवरे आदी उपस्थित होते.
दहावीत इंग्रजी विषयात नापास झालेल्या व पुढे इंग्रजीसह सात भाषांवर प्रभुत्व मिळविलेल्या तसेच जेएनयूमध्ये फ्रेंच तत्त्वज्ञान विषय शिकवणाऱ्या डॉ. बाविस्कर यांच्या संघर्षमय प्रवासाला मान्यवरांनी दाद दिली. डॉ. बाविस्कर हे जयहिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचे डॉ. के. बी. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉ. बाविस्कर यांचा संघर्ष इतरांपेक्षा वेगळा आहे. सामाजिक, आर्थिक अडचणींसोबतच कौटुंबिक अडचणींचाही संघर्ष त्यांना करावा लागला आहे. आज ते जेएनयूसारख्या देशातील सर्वोच्च विद्यापीठात प्राध्यापक आहेत. मात्र जयहिंद महाविद्यालयात शिकत असताना एक नव्हे तर दोन विभागांत कमवा व शिका योजनेत काम केले होते. आजचे यश त्यांना नशिबाने मिळालेले नाही तर त्यांच्या प्रयत्नांचे ते फळ आहे. जेएनयूसारख्या विद्यापीठाची ओळख पुसण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे भाष्यही त्यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ. बाविस्कर यांनी पुस्तक लिहिण्याचा उद्देश स्पष्ट केला. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शिक्षणामुळे विवेक निर्माण होतो. विवेक निर्माण झाला नाही तर जगण्याला कोणताही अर्थ उरत नाही. उपयुक्ततावादी व गतिशील शिक्षण आवश्यक आहे. समाजातील अंतर विचाराने कमी होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
म्हणून लिहिले पुस्तक
डॉ. बाविस्कर यांनी परदेशात वास्तव्याला असतानाच किस्सा सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तो प्रचंड व्हायरल झाला होता. अशा विविध पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यांना पुस्तक लिहिण्याचा आग्रह झाला. तसेच कोरोनाच्या काळात वेळ मिळाल्याने पुस्तक आकाराला येऊ शकल्याचे त्यांनी सांगितले.