छोट्या शेतकऱ्यांची जमीन मशागतीची मदार बैलांवर अवलंबून असते. शेतात यांत्रिकीकरण आले असले, तरी अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलांचा शेतीकामासाठी मोठा आधार मिळतो. या बैलजोड्यांची खरेदी-विक्री मान्सूनपूर्व काळात होते. मध्यप्रदेशातील खेतिया, तसेच महाराष्ट्रातील दोंडाईचा, नंदुरबारमध्ये बैलांचा मोठा बाजार भरतो. ग्रामीण भागातही काही व्यापारी फिरता बाजार करतात; परंतु ऐन हंगामात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बैलजोड्यांची खरेदी-विक्री थांबली आहे.
खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. हा हंगाम बैलशक्तीवर अवलंबून असल्याने या व्यवहाराला फार महत्त्व आहे, यासाठी शेतकरी गुढीपाडव्यानंतर बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करतात. यंदा लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सर्व प्रकारचे बाजार बंद आहेत. याचा फटका प्रामुख्याने जनावरांच्या बाजाराला मोठ्या प्रमाणात बसला आहे. बैल बाजार बंद असल्याने शेतकरी बैलजोडीचा वैयक्तिक स्तरावर शोध घेत आहेत. चांगल्या दर्जाचे नामवंत जातीचे सहजपणे मिळणे कठीण झाले आहे.
यांत्रिकीकरणाच्या युगात कामे गतिमान झाली आहेत, यात शंका नाही. मात्र, अजूनही बऱ्याच कामांना बैलजोडीशिवाय पर्याय नाही. खरीप हंगामाची तयारी करीत असताना सरी पाडणे, लागवडपूर्व मशागत, अनेक ठिकाणी शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत, अशा ठिकाणी शेतीमाल वाहतुकीसाठी बैलगाडीचा उत्तम पर्याय ठरतो. ऐन हंगामात बैल खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी चिंतित आहेत.
आर्थिक उलाढाल मंदावली
खरेदी-विक्रीसाठी बैल बाजाराच्या ठिकाणी लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचे भाव ४० हजारांपासून ७० हजारांपर्यंत असतात. उलाढाल लॉकडाऊनमुळे ठप्प झाली असल्याने परिसरातील अर्थकारणालाही मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागात फिरणारे छोटे-मोठे व्यापारीही दिसेनासे झाले आहेत. त्याचबरोबर शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी आपापसांत बैल उलटसुलट करून खरेदी-विक्री करीत असतात; परंतु यावर्षी पैशांची आवक घटल्यामुळे वैयक्तिक खरेदी-विक्रीदेखील मंदावली आहे.