दोंडाईचातील राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेश सोहळ्याला विरोधाची किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 22:53 IST
समाज माध्यमावर व्हायरल झाला संदेश, अनेकांचा आज पक्षप्रवेश
दोंडाईचातील राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेश सोहळ्याला विरोधाची किनार
धुळे : राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये ‘इनकमिंग’ सुरू झाले असतांना पक्षप्रवेशावरून पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहे. या संदर्भात समाजमाध्यमावर संदेश व्हायरल झाले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये पक्ष प्रवेशावरून कुठलाही वाद नसल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे.माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप व अन्य पक्षात असलेले अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील अनेकांनी हातावर ‘घड्याळ’ बांधलेले आहे.त्याच पार्श्वभूमिवर मंगळवारी दोंडाईचा येथील अनेक आजी-माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असून, माजी आमदार तथा पक्षाचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. दरम्यान हा पक्ष प्रवेश सोहळा जिल्हाध्यक्ष किरण शिंदे व माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे यांची पूर्व परवानगी न घेता होत असून केवळ जनतेचा गैरसमज व्हावा म्हणून बॅनर्सवर किरण शिंदे, संदीप बेडसे यांचे फोटो टाकल्याचा संदेश समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने पक्षात खळबळ उडालेली आहे. पक्ष प्रवेश सोहळ्यापूर्वीच पक्षात विरोधकांचा एक गट तयार झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. कोण-कोण प्रवेश करणार?दरम्यान दोंडाईचा हा पूर्वीपासूनच कॉग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या काही वर्षात भाजपने येथे मुसंडी मारीत पालिकेवर वर्चस्व निर्माण केलेले आहे. आता भाजपच्या गडातच हा पक्ष प्रवेश सोहळा होत असल्याने, भाजपसह अन्य पक्षाचे कोण-कोण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, याची शहरवासियांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. आजी-माजी नगरसेवक व काही पदाधिकारयांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास दोंडाईचा पर्यायाने तालुक्याचे राजकारणही बदलू शकते असा अंदाज राजकीय गोटात व्यक्त होऊ लागला आहे. ५४ खेड्यात पडसाद उमटतातदिवाळीचा सण तोंडावर असताना फटाक्यांची आतिषबाजी ऐवजी दोंडाईचा शहरात राजकीय फटाके वाजवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत दिले आहेत. या राजकीय फटाके वाजवून ग्रामीण भागातील जवळपास ५४ खेड्यात देखील याचे पडसाद उमटतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोण कोण प्रवेश करणार याकडे नागरिकांचे देखील लक्ष लागून आहे. एकंदरीत पुढच्या वर्षाअखेर होणाऱ्या पालिका निवडणुकी साठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.