धुळे : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे माझी वसुंधरा अभियान टप्पा २ अंतर्गत विशेष प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच ऑनलाइन पद्धतीने पार पडली. प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागी सर्व घटकांची क्षमता बांधणी करण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अभियानाचे समन्वय अधिकारी तथा जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक प्रदीप पवार होते.
यावर्षी जून महिन्याच्या ५ तारखेपासून राज्यात माझी वसुंधरा अभियान टप्पा २ ची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत सद्य:स्थितीत वृक्षारोपण व हरित शपथ हे दोन मुख्य उपक्रम सुरू असून सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात या अभियानात ३२ ग्रामपंचायतीनी आपला सहभाग नोंदवला आहे. या अभियानाच्या संकेतस्थळावर जाऊन ग्रामीण भागातील नागरिकांनी वैयक्तिक व सामूहिकरित्या हरित शपथ घ्यावयाची आहे. शपथ व ग्रामपंचायतीच्या एमआयएस लॉगिनमध्ये येणाऱ्या अडचणी व त्यातील माहिती परिपूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील सहभागी ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, केंद्र चालक व सर्व विभाग प्रमुख यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा झाली. यावेळी अभियानाचे प्रकल्प संचालक सुधाकर बोबडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य स्तरावरील मूल्यमापन व संनियंत्रण तज्ज्ञ नितेश होडबे व अभियानातील नाशिक विभागाच्या समन्वय अधिकारी मुक्ता साळुंखे यांनी सखोल, समर्पक मार्गदर्शन केले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी हरीत शपथ वृक्षारोपण सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनसारखे पर्यावरण पूरक उपक्रम राबवत सदर नोंदणी संकेतस्थळावर ऑनलाइन करण्याबाबत सूचना केल्या. कार्यशाळेत ग्रामपंचायतीनी कृती संगम आराखडे तयार करण्याबाबत संवाद सल्लागार अरुण महाजन यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी जिल्हा कक्षातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी नंदकुमार पाटील, वरिष्ठ सहायक डी. एम. जगताप, शाखा अभियंता रवींद्र देसले, समाजशास्त्रज्ञ दीपक पाटील, संवादतज्ज्ञ संतोष नेरकर, पाणी गुणवत्ता सल्लागार विजय हेलिंगराव, मनुष्यबळ विकास सल्लागार दीपक देसले, क्षमता बांधणी तज्ञ मनोज जगताप, सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार वैभव सयाजी, सनियंत्रण तज्ज्ञ प्रशांत देव, वित्त नी संपादणूक सल्लागार संगीता ओझा, डाटा एन्ट्री ऑपरेटर जीवन शिंदे आदींनी परिश्रम घेतले.