जिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता गरोदर महिलांनाही कोरोनाची लस घेता येणार आहे. यापूर्वीच स्तनदा मातांच्या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. मात्र गरोदर महिलांना लसीकरणातून वगळण्यात आले होते. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता गरोदर महिलादेखील लस घेऊ शकतात. शहरातील लसीकरण केंद्रांवर गरोदर महिलांचे प्राधान्याने लसीकरण केले जाणार असल्याची माहिती मनपाच्या लसीकरण अधिकारी डॉ.पल्लवी रवंदळे यांनी दिली.
प्रश्न - पोर्टलवर नोंदणी करूनही शेड्युल मिळत नसेल तर काय करावे ?
उत्तर - कोरोनाची लस घेण्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करावी. त्यानंतर कोणत्या केंद्रावर लस घ्यायची आहे त्याची निवड करावी. तांत्रिक कारणामुळे शेड्युल मिळाले नाही व केंद्राची निवड करता आली नाही तर लसीकरण केंद्रावरही नोंदणी करता येते. लसीकरण केंद्रावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना नोंदणी करण्याबाबत सांगावे तसेच सोबत ओळखपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे.
प्रश्न- गरोदर महिलांसाठी विशेष केंद्राचे नियोजन केले आहे का ?
उत्तर - आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार गरोदर महिलांनाही कोरोनाची लस घेता येणार आहे. आपल्या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात लस घेण्यासाठी जाणे गरोदर महिलांसाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे विशेष लसीकरण केंद्र निर्माण करण्यात आलेले नाही. पण शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर दिव्यांग बांधव व जेष्ठ नागरिक यांच्याप्रमाणे गरोदर महिलांना प्राधान्याने लस देण्याबाबत सूचना केल्या आहेत. कोणतीही शंका न बाळगता तत्काळ लसीकरण करून घ्यावे.
प्रश्न - दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आले आहे, त्याचे कारण काय ?
उत्तर - लसीकरणाबाबत सतत संशोधन केले जात आहे. अभ्यासातून ज्या बाबी समोर येतात. त्यानुसारच बदल केले जातात. पहिला डोस घेतल्यानंतर जास्त अंतराने दुसरा डोस घेतला तर लसीची परिणामकारकता वाढत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ८४ दिवसांनंतर घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस मात्र २८ दिवसानंतर घेणे आवश्यक आहे.
शहरातील एक लाख नागरिकांनी घेतली लस -
धुळे शहरातील लस घेतलेल्या नागरिकांची संख्या एक लाखापेक्षा अधिक झाली आहे. १ जुलैपर्यंत शहरातील १ लाख २ हजार ५४७ नागरिकांनी लस घेतली आहे. त्यात, ८१ हजार ९११ जणांनी कोविशिल्ड तर २० हजार ६३६ जणांनी कोवॅक्सिन ही लस घेतली आहे.
गरोदर महिलांसाठी लसीकरण आवश्यक -
गरोदर महिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांचे आरोग्य बिघडू शकते. यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो, असे अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे गरोदर महिलांनी तातडीने लस घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.