जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४२ हजार ३०० रुग्ण बाधित झाले आहेत. एप्रिल महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने सध्या बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे प्रशासनाने नियम व अटी लागू करीत आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र नजीकच्या जिल्ह्यात डेल्टा प्लस रुग्ण आढळून आल्याने खबरदारी म्हणून २६ जूनपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यासाठी आस्थापना दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी चारपर्यंत, तर अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार व रविवारी व्यापार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
पहिल्याच शनिवारी उल्लंघन
शनिवारी व रविवार दोन दिवस आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. असे असताना महिन्याच्या पहिल्याच शनिवारी सकाळी आग्रा रोड, पारोळा रोड, कराचीवाला खुटं, चाळीसगाव रोड, बारापत्थर, फाशीपूलसह पाच कंदील भागातील व्यावसायिकांनी नेहमीप्रमाणे बाजारात दुकाने थाटली होती.
खरेदीसाठी गर्दी कायम
सोमवार ते शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी आहे. मात्र तरीही या नियमांकडे दुर्लक्ष करीत काही व्यापारी, व्यावसायिक सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवतात. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी नागरिकांची सायंकाळी सहा वाजेपर्यंत गर्दी दिसून येते. शिवाय खरेदीसाठी येणारे नागरिक मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी करताना दिसून येतात.
महापालिकेचे पथक दिसेना
शनिवार व रविवारी दोन दिवस आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन व्यावसायिकांकडून होते किंवा नाही याची खात्री करण्यासाठी सकाळपासून बाजारात महापालिकेचे पथक तैनात करण्याची गरज होती. मात्र सकाळी ७ ते ११ पर्यंत आग्रा रोड, पाचकंदील, पारोळा रोड तसेच अन्य ठिकाणी पथकाकडून कोणत्याही ठिकाणी कारवाई होताना दिसून आलेली नाही.
काही चाैकांतच पोलीस
नागरिकांनी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे व कोविड नियमावलींचे काटेकोर पालन करणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. असे असतानादेखील दुर्लक्ष करणाऱ्यांवर विनामास्क फिरणे, गर्दी करणे व सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणे अशा बाबतींत व्यक्तींवर ५०० रुपये दंड पोलीस व महापालिकेकडून केला जाऊ शकतो. मात्र शहरातील संतोषी माता चाैक, पारोळा रोड, कराची वालाखुंट अशा ठिकाणी पोलिसांकडून कारवाई होताना दिसून आली; तर शनिवारी काही ठिकाणी नागरिक बिनधास्त फिरताना दिसून आले.