धुळे : चारित्र्यावर संशय घेवून मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू असतानाच विवाहितेच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने केलेल्या जखमा आढळून आल्या. त्यामुळे तिचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. तालुक्यातील बोरसुले शिवारात शनिवारी रात्री तिचा मृतदेह आढळून आल्याने रविवारी सायंकाळी पतीसह चार जणांविरुध्द खुनाचा गुन्हा सोनगीर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.धुळे तालुक्यातील बोरीस येथील सुनील आनंदा देवरे (भील) याचा विवाह लक्ष्मीबाई हिच्याशी झाला. लग्नानंतर अवघ्या काही दिवसानंतर तिच्यावर चारित्र्याचा संशय घेतला जात होता. यातून तिला वेळोवेळी चापटाने मारहाण केली जात होती. शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. धुळे तालुक्यातील बोरसुले शिवारात भाऊसाहेब शिंदे यांच्या शेतात लक्ष्मीबाई पडलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा आढळून आल्या. तिला अमानुषपणे मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा संशय लक्ष्मीबाई हिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या पुर्वी बोरसुले शिवारात भाऊसाहेब शिंदे यांच्या शेतात घडला आहे.याप्रकरणी जिभाऊ नथ्थू मोरे (भील) (वय ६५, रा. टेंभे प्र. ता. साक्री) यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, संशयित सुनील आनंदा देवरे (भील), आनंदा मानसिंग देवरे (भील) उषाबाई आनंदा देवरे (भील) रवींद्र आनंदा देवरे (सर्व रा. बोरीस ता. धुळे) यांच्याविरोधात भादंवि कलम ३०२, ४९८, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील या घटनेचा तपास करीत आहेत.
चारित्र्याचा संशय घेवून विवाहितेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 21:54 IST