धुळे - येथील वाडीभोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलासह गरुड मैदानावरील व्यापारी संकुलातील २२३ गाळेधारकांनी भाडेपट्ट्याचा करारनामा न केल्यास तसेच थकीत भाडे न भरल्यास गाळ्यांची जप्ती करण्यात येईल असा इशारा जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिला आहे. याबाबत गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गाळेधारकांना त्यांनी अंतिम नोटीस बजावली.
जिल्हा क्रीडा संकुल व गरुड कॉम्प्लेक्समधील बहुतांश गाळेधारकांनी संकुल समितीचा भाडेपट्ट्याचा करारनामा केलेला नाही. तसेच अनेकांनी सुमारे ४० लाख रुपये इतके भाडे थकविले आहे. त्यामुळे या गाळेधारकांना नोटीस बजावून १० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या कालावधीत भाडेपट्टा करारनामा न केल्यास संकुल समितीमार्फत गाळे जप्तीच्या कारवाईचा इशारा नोटीसच्या माध्यमातून दिला आहे.
येथील जिल्हा क्रीडा संकुल व गरुड मैदानातील व्यापारी संकुले जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येतात. या दोन्ही संकुलांतील गाळे करारनाम्याने भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. जिल्हा क्रीडा संकुलात एकूण १९० गाळे आहेत. त्यापैकी पाच गाळे गेल्या २७ फेब्रुवारीला जप्त करण्यात आले आहेत. गाळेधारकांकडे अनामत रकमेसह मासिक भाडेही थकीत असल्याने जप्तीची कारवाई झाली होती. ज्या गाळेधारकांनी २००६ पासून गाळे घेतले परंतु अद्याप क्रीडा संकुल समितीचा करारनामा केलेला नाही, केवळ गाळ्याची अनामत रक्कम भरली आहे व गाळा ताब्यात घेऊन वापर करत आहेत अशा गाळेधारकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार गाळेधारकांना जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांच्या हस्ते नोटीस देण्यात आली. नोटीस देतेवेळी कार्यालयातील लिपिक योगेश देवरे, योगेश पाटील, ज्ञानेश्वर जाधव, राहुल पाटील आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया -
२२३ गाळेधारकांनी भाडेपट्ट्याचा करारनामा केलेला नाही. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नोटीस बजावली आहे. करारनामा करणे गाळेधारकांच्या हिताचेच आहे. भविष्यात त्यांना त्याचा फायदा होईल.
सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी