कापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे येथील आदिवासी पती-पतीने विष घेवून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला. घटना लक्षात येताच त्यांना प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात नंतर पुढील उपचारासाठी धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.धुळे तालुक्यातील कापडणे येथील खोकरहट्टी आदिवासी भागात राहणारे किशोर झुलाल भिल (३५) हे खडीकाम करतात. तर त्यांची पत्नी संगीताबाई किशोर भिल (३०) या शेतीकाम करतात. त्यांना पाच ते सात वषार्चे दोन मुले आणि एक मुलगी आहे. नेहमीप्रमाणे सर्व काही सुरळीत सुरु असतानाच अचानक रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास किशोर आणि त्यांची पत्नी संगिताबाई यांनी किटकनाशक औषध पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात येताच या दोघांना तातडीने कापडण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर या दोघांना धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न कोणत्या कारणासाठी केला, त्यामागे काही कौटूंबिक कारण आहे की अजून काही दुसरे हे मात्र स्पष्टपणे समजू शकलेले नाही. सोनगीर पोलीस ठाण्यात प्राथमिक नोंद घेण्यात आली आहे.
कापडण्यात पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 21:27 IST