धुळे : जळगाव जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गदीर्चा फायदा घेवून चोरट्याने शिताफीने पर्समधून ७२ हजाराचे दागिने लंपास केले. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास धुळे बसस्थानकात घडली. याप्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.जळगाव जिल्ह्यतील पाचोरा तालुक्यातील शिरसोली येथील साहिदाबी युनुस (४२) या महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, साहिदाबी या ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगावच्या दिशेने जाण्यासाठी धुळे बसस्थानकात दाखल झाल्या. एमएच २० बीएल ३५५५ क्रमांकाची बस जळगावकडे जाण्याासाठी उभी होती. बसवर चढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्याचवेळेस साहिदाबी या देखील बसमध्ये चढण्यासाठी गर्दीत दाखल झाल्या. बसमध्ये चढत असतानाच गदीर्चा फायदा घेवून भुरट्या चोरट्यांनी ही संधी साधून महिलेच्या पर्समधून शिताफिने दागिने लांबविले. बसमध्ये चढल्यानंतर या महिलेला आपल्या पर्सची चैन उघडी असल्याचे दिसून आले. पर्समध्ये ठेवलेले १२ ग्रॅम सोन्याची पंचली पोत, १६ ग्रॅम वजनाची पोत व १२ हजार रुपये रोख असा एकूण ७२ हजार रुपयांचा ऐवज दिसून आला नाही. सर्वत्र शोध घेवून आणि आरडाओरड करुनही चोरटे सापडले नाही. याप्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक दुसाने घटनेचा तपास करीत आहेत.
महिलेच्या पर्समधून ७२ हजाराचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 22:39 IST