गतवर्षाप्रमाणे यंदाही पौर्णिमेनंतर बाजारभाव निश्चित वाढतील या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. गतवर्षी चाळीत साठविलेल्या उन्हाळी कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळाल्यामुळे चालू वर्षीदेखील कांद्याला चांगला दर मिळेल म्हणून मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. परंतु कांद्याच्या बाजारभावातील अस्थिरतेमुळे चाळीतील उन्हाळी कांदा विकण्यासंदर्भात शेतकरी संभ्रमात आहेत. अनेक शेतकऱ्यांना कांदा विक्री करण्यासंदर्भात निश्चित निर्णय घेता येत नाही. त्यातच मोठ्या अपेक्षेने चाळीत साठवणूक केलेला कांदा सडू लागला असून, काही शेतकऱ्यांचे चाळीतील कांदा संपूर्ण सडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सहा ते सात महिने चाळीत टिकणाऱ्या कांद्याला चालू वर्षी वातावरणात होणाऱ्या बदलांचा चांगलाच फटका बसला आहे. कांदा सडू लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता नाईलाजाने चाळीत साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीकरिता नेत असल्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढू लागली आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पोळ कांद्याचे बियाणे शेतात टाकले होते. वातावरणात अचानक होणारे बदल व नुकत्याच झालेल्या रिमझिम पावसामुळे रोपे खराब झाली असून, या शेतकऱ्यांना पुन्हा महागडे बियाणे उपलब्ध करावे लागणार आहे.
*प्रतिक्रिया*
महिनाभरातच कांदा सडू लागल्याच्या तक्रारी
दरवर्षी डिसेंबरपर्यंत चाळीत टिकणारा कांदा चालू वर्षी चाळीत टाकल्यानंतर महिनाभरातच सडू लागल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. परंतु कांद्याचे दर वाढण्याच्या अपेक्षेने शेतकरी होणारे नुकसान सहन करीत होते. परंतु वातावरणातील बदलामुळे कांदे सडण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली व संपूर्ण नुकसान होण्यापेक्षा शाबूत असलेला कांदा विकून मिळेल ते पदरात पाडून घेण्याचा दृष्टिकोन ठेवत शेतकऱ्यांनी चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणण्यास प्रारंभ केला आहे.
समाधान ढिवरे , शेतकरी, ऐचाळे
२) उन्हाळी कांदा बियाणांत झालेली फसवणूक, सर्वत्र तुटवडा असल्यामुळे नाईलाजाने अव्वाच्या सव्वा किंमत मोजून खरेदी केलेले नित्कृष्ट काटा बिर कांद्याची रोपे खराब झाले. अवकाळी पावसामुळे कांद्याच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला.
सरदार खटा पाटील , शेतकरी , बळसाणे