संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दहावी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील टर्निंग पॉईंट असला तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. अंतर्गत मूल्यमापनद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार असले तरी ज्या विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करावयाची असेल त्यांनाही वेगळी संधी दिली जाणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग व विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ढ विद्यार्थीही आटोमॅटिक पास झाला आहे.
दरम्यान, अंतर्गत मूल्यमापन करण्यासंदर्भात गाईडलाईन शिक्षण मंडळ लवकरच जाहीर करणार आहे. यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणीही झाली नाही. तत्पूर्वी शासनाने पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. यात १२ हजार ३९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोंडाईचात एकंदरीत पहिली ते अकरावीच्या वर्गात १८ हजार ७६२ विद्यार्थी विनापरीक्षा पुढील वर्गात जाणार आहेत. यात १ हजार ५८५ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
इंग्रजी माध्यमासह मराठी माध्यमाच्या हुशार विद्यार्थ्यांनी दहावी वर्गाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ऑनलाईन शिकवणी व ऑनलाइन वर्ग अटेंड करून फायदा झाला नसून, अभ्यासक्रमाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे,असे म्हटले आहे.
१: विरपाल गिरासे- पालक : वाढत्या कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय योग्य आहे. परंतु, मुलगा सलग चार-पाच तास अभ्यास करीत असतानाच त्याच्या अभ्यासाचे मूल्यमापन होणार नाही. तरीही आताच्या परिस्थितीत जीव महत्त्वाचा आहे.
२: संगीता पाटील - पालक
: मुलीने ऑनलाईन वर्गासह, खासगी ऑनलाईन शिकवणी वर्गातून अभ्यास केला. मागील वर्षाचे प्रश्नसंचही सोडविले होते. पुढील शिक्षणाचे नियोजन पण झाले होते. आता अंतर्गत मूल्यमापनने पास केले जाणार आहे. कोरोना असला तरी वेगळे नियोजन करून परीक्षा होणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत पण करतो.
३:विनोद माळी : विद्यार्थी - कोरोनाचा संसर्ग पाहता शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. माझ्यासारख्या अनेक गरीब मुलांकडे शालेय व्हिडिओ बघण्यासाठी मोबाईल नाही. आमचा संपूर्ण अभ्यास झाला नव्हता.