धुळे :सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. तिकडे सातपुड्याच्या कुशीतील काही आदिवासी पाड्यांवर मात्र दिवाळीचा काहीही उत्साह दिसून येत नाही. तेथील बालकांच्या अंगावर पुरेसे कपडे देखील नाहीत. शिरपूर तालुक्यातील अशाच काही पाड्यांवरील बालकांना शहरातील यंग फाउंडेशनतर्फे कपड्यांचे वाटप करण्यात आले. यंग फाउंडेशनच्या टीमने शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाडपाणी व जवळच्या पाड्यावरील ५०० बालकांना कपड्यांचे वाटप केले. चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी या पाड्यांवरील बालकांसाठी कपडे पाठविले होते. यंग फाउंडेशनने या पाड्यांवरील विदारक परिस्थिती उजेडात आणल्यानंतर दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी गुऱ्हाडपाणी पाड्याला भेट दिली होती. पुण्यात परत गेल्यावर त्यांनी लहान बालकांसाठी कपडे दान करावेत, असे आवाहन केले होते. पुणेकरांनी त्यांच्या आवाहनास भरभरुन प्रतिसाद दिला. व कपडे जमा केले. तेथून यंग फाउंडेशनकडे ते पाठवण्यात आले. त्यानंतर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ते कपडे लहान बालकांपर्यंत पोहचविले. प्रांताधिकारी विक्रमसिंग बादल यांच्याहस्ते कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संदीप देवरे, प्रकाश पाटील, कुणाल देवरे, दिव्या पाटील, चैताली वाणी, स्वप्नील पाटील, चेतन उपाध्याय, रोहित येवले, राजेंद्र पावरा, सुरेश पावराव मंजुषा पावरा आदी उपस्थित होते.
पाड्यावरील बालकांना कपडे देवून दिवाळी केली ‘गोड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 22:33 IST