दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील गर्भवतींना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. माता व बालकांचे आरोग्य सुदृढ होण्यासाठी गर्भवती व स्तनदा मातेला सकस आहारासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचेही आरोग्य सुधारावे आणि माता व बाल-मृत्यूच्या दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा म्हणून केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात एक जानेवारी २०१७ पासून लागू केली आहे.
प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारणा १ जानेवारी २०१७ रोजी अथवा त्यानंतर झाली असेल, अशाच पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ पहिल्या जीवित अपत्यासाठी दिला जातो. या योजनेंतर्गत तीन टप्प्यांमध्ये पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. पहिला हप्त्यासाठी संबंधित लाभार्थी महिलेला मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांच्या आत गर्भधारणा नोंदणी करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास आणि तिसरा हप्ता प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकास बीसीजीपासून गोवर, रुबेलापर्यंतचे संपूर्ण लसीकरण व त्याअनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर लाभार्थी महिलेच्या आधार लिंक बँक खात्यात लाभ जमा केला जातो.
या योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील ४७ हजार ४१३ पात्र महिला लाभार्थ्यांची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत २० कोटी ८७ लाख ८४ हजार रुपयांचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने वितरित केले आहे. प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताहांतर्गत उर्वरित लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तालुका व शहरी भागातील आरोग्य संस्थानिहाय संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका समूह संघटक, आशा कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व पात्र प्रथम खेपेच्या गर्भवती मातांनी आरोग्य विभागातील आशा, आरोग्य सेविका कर्मचाऱ्यांकडे त्वरित नोंदणी करावी, असेही आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी केले आहे.