चौगावला दोन गटात धुमश्चक्री, पळापळ झाल्याने वाढला तणाव
धुळे : ग्रामपंचायत निवडणुकीतील मतमोजणी सुरु असतानाच तालुक्यातील चौगाव येथे दोन गटात धुमश्चक्री उडाली. नेमके काय झाले हे कळायच्या आतच पळापळ झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरु होते. धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या मतदानानंतर मतमोजणी सोमवारी शासकीय तंत्रनिकेतन येथे पार पडली. मतमोजणी टप्प्या-टप्प्याने पार पडत असतानाच धुळे तालुक्यातील चौगाव ग्रामपंचायतीचा निकाल लागला. विजयी उमेदवाराकडून जल्लोष होत असतानाच त्याचे कमी-अधिक प्रमाणात चौगाव गावात पडसाद उमटले. दोन गट आमने सामने आल्याने तणाव अधिकच निर्माण झाला होता. एकमेकांना शिवीगाळ करीत हे दोन्ही गट एकमेकांवर चालून आले. परिणामी अधिकच तणावाची स्थिती निर्माण झाली होती. काय होत आहे हे कळायच्या आत गावात धावपळ उडाली. या घटनेची माहिती धुळे तालुका पोलिसांना कळताच पथक तातडीने गावात दाखल झाले होते. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत गर्दी पांगविली. दरम्यान, दोन्ही गटातील सदस्यांनी सायंकाळी उशिरा धुळे तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.