लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्ट्र बंदला धुळ्यात बुधवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच सर्व पूर्वपदावर येत आहे़ नेहमीप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस धावत असून शाळा-महाविद्यालय सुरु झाली आहे़ बाजारपेठ देखील गजबजली आहे़ दरम्यान, तीन पोलीस ठाण्यात ८० जणांवर गुन्हे दाखल झाले असून ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे़ धुळ्यात सर्वत्र शांतता आहे़ कोरेगाव-भिमा येथील शौर्य दिनाच्या अभिवादन कार्यक्रमात उमटलेल्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले़ त्याचे लोण धुळ्यातही आले होते़ सोमवारी रात्री दोन बसेसवर दगडफेकीचा प्रकार झाल्यानंतर मंगळवारी दिवसभर तणावाची स्थिती कायम होती़ शहरातील विविध भागात दगडफेक झाल्यानंतर तणाव अधिक वाढला होता़ रास्तारोको आंदोलनही करण्यात आले़ बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यानंतर त्याचे प्रतिबिंब धुळ्यात उमटले़ बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बसस्थानकाजवळील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र जमा झाल्यानंतर मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी डॉ़ दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले होते़ सायंकाळी आंदोलन मागे घेण्याचे जाहीर केल्यानंतरही तणावाची स्थिती कायम होती़ सायंकाळी उशिरा दैनंदिन व्यवहार पुर्ववत होण्यास सुरुवात झाली होती़ गुरुवारी सकाळपासूनच सर्वकाही पुर्वपदावर आले आहे़ बाजारपेठेत गजबज असून दैनंदिन व्यवहार सुरु झाले आहेत़ शाळा देखील नेहमी प्रमाणे भरल्या आहेत़ अशी स्थिती असलीतरी संवेदनशिल भागात मात्र पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आलेला आहे़ धुळ्यात सर्वत्र शांतता आहे़
धुळे शहरासह जिल्ह्यात स्थिती पुर्वपदावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 13:11 IST
पडसादनंतरची स्थिती : बसेस सेवा पुर्वपदावर, शाळाही गजबजल्या
धुळे शहरासह जिल्ह्यात स्थिती पुर्वपदावर!
ठळक मुद्देकोरेगाव भीमा येथील घटनेचे धुळ्यात उमटले होते पडसादमहाराष्ट्र बंद नंतर धुळे शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शांततासंवेदनशिल भागात मात्र पोलीस बंदोबस्त कायम