धुळे : तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी झाली. यात अनेक दिग्गज नेत्यांच्या पॅनलचा पराभव झाला. त्यात कृषी सभापती बापू खलाणे, पंचायत समिती सभापती प्रा. विजय पाटील, शंकरराव खलाणे व भाजपचे नेते सुभाष देवरे यांचा समावेश आहे. दरम्यान, निकालानंतर सर्वच पक्षांनी विजयाचे दावे - प्रतिदावे केले असले तरी तालुक्यात काँग्रेसची सरशी झालेली निकालावरून स्पष्ट दिसून येत आहे. धुळे तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झालेली होती. मात्र, माघारीपर्यंत ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने, गेल्या शुक्रवारी ६६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ७७.१७ टक्के होती. दरम्यान, झालेल्या मतदानाच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागून होते.सोमवारी धुळ्यातील शासकीय तांत्रिक व कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यासाठी ३२ टेबलची व्यवस्था करण्यात आलेली होती. सकाळी १०.४० मिनिटांनी पहिला निकाल अंबोडे ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. येथे सरपंच असलेल्या अनिल पारखे यांच्या पॅनलने बाजी मारली. त्यांच्या पॅनलमधील सुरेश यादव, शोभा थोरात, मनोज थोरात, प्रमिलाबाई पारखे, बेबीबाई पारखे, योगेश यादव हे विजयी झाले. तर लोकसेवा विकास पॅनलच्या तीन जागा निवडून आल्या. तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काँग्रेसचे भाऊराव पाटील व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बापू खलाणे यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होती. या ठिकाणी काँग्रेसच्या पॅनलने १६पैकी १२ जागांवर विजय मिळविला, तर बापू खलाणे यांच्या पॅनलला तीन ते चार जागांवरच समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे नेर ग्रामपंचायतीत मतदारांनी परिवर्तन घडवून आणले. याठिकाणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या गायत्री जयस्वाल यांच्या पॅनलने शंकरराव खलाणे यांच्या पॅनलचा धुव्वा उडवित १७ पैकी १० जागांवर विजय मिळविला. या ठिकाणी दोन अपक्षांनाही संधी मिळाली. भाजपचे नेते सुभाष देवरे यांचे गाव असलेल्या बोरीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी सुभाष देवरे यांना धक्का दिला. बोरीस ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीला पाच, तर भाजपला पाच जागांवर समाधान मानावे लागले. पंचायत समिती सभापती प्रा. विजय पाटील यांच्या उडाणे ग्रामपंचायतीत मतदारांनी त्यांनाही जोरदार धक्का दिला. या ठिकाणी आमदार पाटील यांच्या पॅनलने प्रा. पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला. गरताड येथील ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व मिळविले. या ठिकाणी नऊपैकी नऊ जागा काँग्रेसने जिंकल्याचे सांगण्यात आले. खंडलाय येथे काँग्रेसने ७पैकी ७ जागा जिंकल्या, तर सरवड येथे परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व म्हणजे ९ जागा जिंकल्या. शिरूडला १७ पैकी १३ काँग्रेसने, तर ४ जागा भाजपने जिंकल्या आहेत.निकाल ऐकण्यासाठी प्रचंड गर्दीदरम्यान, ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होणार असल्याने, शहरातील जेल रोड तसेच कमलाबाई कन्याशाळा चौकात उमेदवार व त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झालेली होती. कारागृह ते कमलाबाई चौकपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता. दोन्ही बाजुंना बॅरिकेट्स लावण्यात आलेले होते. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. गुलाल उधळण्यास तसेच वाद्य वाजविण्यास बंदी असली तरी या चौकाच्या पुढे जात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत ढोल ताशांच्या तालावर नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला.प्रशासनाची दिरंगाईजिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये निकाल लवकर कळत असताना धुळ्यात मात्र प्रशासनाची दिरंगाई दिसून आली. जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींचा निकाल देण्यासही टाळाटाळ केली जात होती. माध्यमांच्या प्रतिनिधींना कुठलेही सहकार्य यावेळी करण्यात आले नाही.
धुळे तालुक्यात दिग्गजांचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 22:33 IST