वजन वाढण्याचे कारण
कोरोना महामारीच्या काळात शाळा, कॉलेज, क्लास तसेच मैदानी खेळ बंद असल्याने मुलांना टीव्ही व मोबाइलशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अनेकांना या काळात हे व्यसन जडले आहे. त्यामुळे लहान मुलांमधील लठ्ठपणा ही पालकांसाठी फार मोठी समस्या झाली आहे. काही मुले हे लहानपणापासूनच लठ्ठ असतात. या वाढत्या लठ्ठपणामुळे त्यांचा शारीरिक फिटनेस व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणामध्ये आणि इतर खेळांमध्ये मन लागत नाही. शारीरिक फिटनेस जर चांगला असेल, तर मुले शिक्षणामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये यशस्वी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी
फळांमुळे मुलांमध्ये स्मरणशक्ती वाढते व मेटाबोलिजम सुधारते. मुलांना मधल्या वेळेत थोडी फळे दिल्याने मुलांचे पोट भरेल. त्यामुळे ते वजन वाढवणारे इतर पदार्थ खाणार नाहीत. पालकांनी मुलांच्या पौष्टिक खाण्यावर भर द्यावा. ज्यामध्ये उदाहरणार्थ गहू, ओटस्, बार्ली, वाटाणे सोयाबीनसारख्या पौष्टिक धान्यामुळे मेंदू कार्यक्षम होतो व शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते या पदार्थांमुळे मुलांची भूक व्यवस्थित बांधल्यामुळे बाहेरचे खाद्यपदार्थ ते कमी खातात. मुलांना दूध खूप आवडते. दुधातून कॅल्शियम मिळते. मुलांना नियमित दूध द्यावे. पालकांनी मुलांना ड्रायफ्रूट खाण्यास द्यावे. ड्रायफ्रुटस्मध्ये उदाहरणार्थ अक्रोड, बदाममध्ये जिंगसारखे पोषणमूल्य असते.
मुले टीव्ही, मोबाइल सोडतच नाहीत
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय, तसेच क्लासेस बंद आहेत. त्यामुळे मुलांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र, यामुळे मुलांना मोबाइलचे व्यसन जडले आहे. मुलांना रागविल्यावरदेखील काही उपयोग होत नाही.
-प्राजक्ता पुराणिक, पालक
लॉकडाऊन काळात सर्वांनी घरीच थांबण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मुलांना बाहेर जाण्यासाठी थांबविता यावे, यासाठी टीव्ही आणि मोबाइल हा एकमेव पर्याय होता. अशा काळात मुलांना मोबाइलचे व्यसन जडले. आता लॉकडाऊन जरी नसले तरी मुले मोबाइल सोडत नाहीत.
-विजय पाटील, पालक
सकस आहार द्यावा
मुले सध्या मोबाइल, टीव्हीचा वापर सर्वाधिक करीत आहेत. त्यामुळे एकाच जागेवर बसून राहिल्याने लठ्ठपणा जाणवत आहे. मुलांना लठ्ठ होण्यापासुन टाळण्यासाठी मुलांच्या आहारात भाजी, पोळी, पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा, फळे आवर्जून द्यावीत. चरबीयुक्त पदार्थ शक्यतो टाळावीत. केक, चॉकलेट, तसेच बाहेरील पदार्थ टाळणे गरजचे आहे.
-डॉ. अभिनय दरवडे, बालरोगतज्ज्ञ, धुळे
मुलांसोबत खेळा
मुलांना एकाच ठिकाणी बसवून ठेवू नका. सकाळी, सायंकाळी पालकांनी मुलांसोबत बाहेर फिरण्यासाठी जावे, मैदानी खेळ खेळावेत, तसेच आहारात पालेभाज्या, फळांचा वापर करावा, तसेच चरबीयुक्त पदार्थ टाळावेत.
-डॉ. दीपक पाटील