धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे परिसरात काटेरी झुडपांसह गवतही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या शाळा परिसरांमध्ये स्वच्छता होणे गरजेचे आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र, पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग ॲानलाइन पद्धतीने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थीच नसल्याने, गेल्या दीड वर्षापासून स्वच्छता मोहीमच रखडलेली आहे. काही शाळांचा परिसर तेथील शिक्षक स्वच्छ ठेवत असले तरी काही शाळांच्या परिसरात झुडपे, गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येतात.
सध्या शाळेत विद्यार्थी येत नसले तरी शिक्षकांची उपस्थिती असते. येत्या काही महिन्यांत शाळा सुरू झाल्यास, विद्यार्थ्यांना याचा मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे शाळांचा परिसर स्वच्छ होणे गरजेेेचे आहे.
वर्गखोल्यांमधील धूळ हटेना
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू असताना वर्षभर काही ना काही कार्यक्रम होत असतात. त्यामुळे शाळेत नीटनेटकेपणा ठेवला जातो. वर्गखोल्यांमध्येही विशेष स्वच्छता करण्यात येत असते.
मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे खोल्यांमध्येही जळमटेशिवाय धूळ मोठ्या प्रमाणात झालेली असून, त्यांचीही स्वच्छता होणे गरजेेचे आहे.
जबाबदारी कोणाची?
ग्रामीण भागात गावपातळीवर शाळा व्यवस्थापन समिती असते. तसेच शिक्षक-पालक संघ असतो. या समितीच्या माध्यमातून शाळांची कामे, शाळा सुविधा व गुणवत्तेवर लक्ष ठेवले जात असते. मात्र, कोरोनामुळे विद्यार्थ्यांविनाच शाळा असल्याने, अनेक शाळा अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडलेल्या आहे. अशा स्थितीत शाळा स्वच्छतेची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
शिक्षकांची उपस्थिती किती
जिल्हा परिषद शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांची उपस्थिती पूर्ण आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील खासगी प्राथमिक शाळाही बंद आहेत. मात्र त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवण्यात येत असतो. त्याचप्रमाणे जि. प. शाळांचा परिसरही स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.