धुळे - विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. खाजगी व शासकीय रुग्णालयातील लहान मुलांची गर्दी वाढली असून ओपीडीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. पण विषाणूजन्य आजार वाढले आहेत. सर्दी, खोकला, डोकेदुखी आदी लक्षणे लहान बालकांमध्ये दिसत आहेत. वातावरण बदलामुळे हा त्रास होत असून तीव्र लक्षणे असलेल्या बालकांचीच कोरोना चाचणी करीत असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले. आतापर्यंतच्या सर्वच कोरोना चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.
१० टक्के मुलांची कोरोना चाचणी
- ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे लहान मुलांमध्ये दिसत आहेत. तीव्र लक्षणे असलेल्या मुलांची कोरोना चाचणी केली जात आहे.
- सुमारे १० टक्के बालकांची आरटीपीसीआर ही कोरोना चाचणी केली जात आहे. पॉझिटिव्हिटी मात्र शून्य टक्के असल्याची माहिती मिळाली.
डेंग्यू - मलेरियाची चाचणी
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सध्या केवळ तीन कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आहे. डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली असून चाचण्याही वाढल्या आहेत.
ही घ्या काळजी -
१ बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. तेलकट पदार्थ खाऊ नये.
२ आईस्क्रीम, कुल्फी व इतर थंड पदार्थ खाऊ नये.
३ गर्दीत जाणे टाळावे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.
बालरोग तज्ज्ञ म्हणतात....
काही दिवसांपासून ओपीडीतील लहान मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरवर्षी जुलै महिन्यानंतर रुग्णांची संख्या वाढत असते. यावर्षी मात्र आजारी पडणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. पण खूप कमी जणांना ॲडमिट करण्याची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये.
- डॉ. तुषार कानडे, बालरोग तज्ज्ञ
जुलै महिन्यापासून विषाणूजन्य आजार वाढले आहेत. घरात आजारी व्यक्ती असेल तर लहान मुलांपासून वेगळे रहा. त्यांना स्पर्श करणे टाळा. आहारामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे डाळी, उसळ हिरव्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ असा सकस आहार घ्यावा.
- डॉ.नीता हाटकर, बालरोग तज्ज्ञ हिरे महाविद्यालय