धुळे : देवपुरातील नकाणे रोडला लागून असलेल्या किरण सोसायटीत एक हजार लिटर पाण्याच्या टाकीत मजुराचा मृतदेह आढळून आला. मजुराचा मृत्यू हा बुडून झाल्याचा अंदाज आहे. शकील शेख असे मृताचे नाव असून त्याचा घातपात झाल्याचा संशय त्याच्या नातलगांनी केला आहे. कठोर कारवाई होईपर्यंत मृतदेह हाती घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. पण, पोलिसांनी समजूत काढल्यामुळे त्याच्या मृतदेहावर दफनविधी करण्यात आला.नकाणे रोडवरील किरण सोसायटीत एका ठिकाणी काम सुरु आहे. याठिकाणी शकील शेख सिराज (४०, काझी प्लॉट, नटराज चित्रपटगृहाजवळ, धुळे) हा काम करीत होता. रविवारी त्याने दोन सहकारीसोबत काम केले. त्यानंतर तो बेपत्ता झाला. सोमवारी सकाळी पुन्हा बांधकामाला सुरुवात झाली. बांधकामासाठी पाणी घेण्याकरीता टाकीचे झाकण उघडल्यावर त्यात शकील शेख याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर शकीलच्या कुटुंबियांना कळविण्यात आले. काही वेळातच त्याचे कुटुंबिय दाखल झाले. पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक सतिष गोराडे पथकासह दाखल झाले. शकीलचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याचा कोणीतरी घातपात केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे शकीलला कामावर नेणारा ठेकेदार आणि बांधकाम मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरल्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते. कठोर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेण्यात आली होती. पोलिसांनी समजूत काढूनही नातेवाईक समजून घेण्याच्या तयारीत नव्हते. अखेर उपअधीक्षक दिनकर पिंगळे, पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने सायंकाळी पांझरा नदी किनारी असलेल्या अंजन शहा दर्गाजवळील कब्रस्तानमध्ये दफनविधी झाला. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली.
मजुराचा मृतदेह आढळला पाण्याच्या टाकीत, घातपाताचा नातलगांचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 22:37 IST