धुळे : सध्याच्या युगात तरुण-तरुणी सोशल मीडियावर सर्वाधिक ॲक्टिव्ह झाल्याने आता लग्नासाठी जोडीदार शोधताना देखील ऑनलाईनलाच प्राधान्य दिले जात आहे. यामुळे फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत.
इंटरनेटच्या महाजालामुळे लग्न जुळविण्यासाठी बायोडाटा अपलोड करणाऱ्या अनेक वेबसाईट आहेत. यावर तरुण-तरुणी बायोडाटा अपलोड करतात किंवा सर्च करतात, परंतु ऑनलाईन जोडीदार शोधताना फसवणूक झाल्याचे गुन्हे धुळे जिल्ह्यात तरी अजूनपर्यंत घडलेले नाहीत. असे असले तरी तरुण, तरुणी आणि त्यांच्या पालकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन जुळलेली लग्नं यशस्वी झाल्याचीही उदाहरणे आहेत.
ही घ्या काळजी
लग्न जमवण्याच्या सगळ्या पद्धतींमध्ये काही ना काही धोका असू शकतो. तसाच तो ऑनलाइन माध्यमांमध्येही आहेच. तेव्हा ती वापरताना नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे.
प्रोफाइलमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधून ते खरा असल्याची शहानिशा करा. शक्य असल्यास पत्त्याविषयीही माहिती मिळवा.
एखाद्या व्यक्तीशी संपर्क करायचा झाल्यास त्याच्या कुटुंबाविषयी सर्व माहिती मिळवा. ते कुटुंब कसं आहे, कुठं राहातं, काय करतं अशी जास्तीत जास्त माहिती मिळवा.
अशी होऊ शकते फसवणूक
बहुतेक वेबसाइट्सवर नोंदणी मोफत असल्यानं कित्येक खोट्या प्रोफाइल्स असतात, तर अनेकांच्या प्रोफाइलमध्ये खोटी माहिती दिलेली असते. त्यामुळे प्रोफाइलमध्ये कितपत माहिती दिली आहे यावरून त्या व्यक्तीविषशी अंदाज बांधण्याचा प्रयत्न करा. अन्यथा आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशा वेबसाईटवर बायोडाटा अपलोड करणे फ्री असते. त्यामुळे या क्षेत्रात ठगांच्या टोळ्या सक्रिय आहेत. वर किंवा वधूला अथवा त्यांच्या पालकांशी सोशल मीडियावर किंवा फोनवरुन भावनिक नाते निर्माण करुन पैसे उकळण्याचे प्रकार घडतात. तसेच ऐन लग्नाच्या वेळी पैसे नसल्याचे सांगत ऑनलाईन पैशांची मागणी होते.
फेसबुकवरून लग्न जुळवण्याचं प्रमाणही वाढतंय. संपर्क साधण्यासाठी हे माध्यम वापरायला हरकत नसली तरी फक्त त्या आधारे घाईनं निर्णय घेऊ नका. फेसबुकवर जमलेले लग्न यशस्वी झाल्याचीही उदाहरणे आहेत.
एखाद्या व्यक्तीशी संपर्क करायचा झाल्यास त्याच्या कुटुंबाविषयी सर्व माहिती मिळवा. ते कुटुंब कसं आहे, कुठं राहातं, काय करतं अशी जास्तीत जास्त माहिती मिळवा. निर्णय घेताना घाई करु नका.