अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर, समुपदेशन तसेच आश्रयाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी शहरात ‘सखी वन स्टॉप सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून प्रत्येक जिल्ह्यात महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘ सखी वन स्टॉप सेंटर’ सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी स्वतंत्र जागेवर सेंटर सुरू करण्याचे निकष लागू हाेते. मात्र शहरातील शासकीय कार्यालये करार तत्त्वावर असल्याने या सेंटरसाठी दोन वर्षांपासून जागा मिळू शकलेली नाही. त्यामुळे ‘जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर’बाबत जनजागृती नसल्याने चारीही तालुक्यांतून एकही तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही.
जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल
‘सखी वन स्टॉप सेंटर’साठी जागेची अडचण असल्याने प्रशासकीय संकुलातील जागेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.
या केंद्रातून अशी मिळणार मदत
महिलांना शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ व सायबर क्राईममधील पीडित महिलांना पोलीस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. मात्र, अत्याचारानंतर या विविध विभागांकडे जाऊन कोणत्याही प्रकारची मदत घेण्याची मानसिकता त्या महिलेची उरलेली नसते. याचसाठी अन्याय झालेल्या महिलेला आधार देण्यासाठी ‘सखी वन स्टॉप’ काम करीत आहे.
नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत सखी वन स्टाॅप सेंटर सध्या सुरू आहे. धुळे शहरात कार्यालयासाठी जागेची अडचण असल्याने दोन वर्षांपासून सेंटर सुरू होऊ शकली नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत लवकरच सेंटरसाठी जागेचा प्रस्ताव पाठविण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार प्रशासकीय संकुलातील जागेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
- हेमंतराव भदाणे,
महिला बालविकास अधिकारी
जनजागृती करणार
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असल्या तरी, त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटनाही वाढत असल्याची बाब गंभीर आहे. अन्याय झालेल्या महिलेला आधार देण्यासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ जिल्ह्यात सुरू झाल्याने अनेकांना मोफत कायदेशीर सल्ला मिळू शकतो. या सेंटरसाठी हालचाली सुरू झाल्या असून, जिल्हाभरात सेंटरच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या कामकाजाविषयी जनजागृती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.