सुनील साळुंखेशिरपूर : सार्वजनिक धान्य प्रणाली अंतर्गत कुणीही धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने गेल्या काही वर्षापासून कुठल्याही धान्य दुकानातून धान्य खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रास्त धान्य दुकानांमधील लाभार्थ्यांना आता कुठल्याही दुकानातून आधारकार्ड नोंदणी क्रमांकाच्या सहाय्याने धान्य खरेदी करता येत आहे. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात ९ हजार ५४२ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.पूर्वी रास्त दर धान्य दुकानातून धान्य नेणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या परिसरातील दुकानातूनच धान्य खरेदी करावे लागत होते. त्यामुळे कामानिमित्त बाहेरील भागात राहणाऱ्यांना धान्याचा लाभ घेता येत नसे.लाभार्थी आपल्या हक्कांपासून वंचित राहू नये यासाठी शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाकडून पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावातच नव्हे तर अगदी महाराष्ट्र आणि त्याबाहेरील काही राज्यांमध्येही पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेता येत आहे. लॉकडाऊनच्या काळात या सुविधेचा लाभ सर्वाधिक मिळाला आहे.आदिवासी व ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानदारांकडून रेशन कार्डधारकांना अनेकदा वेठीस धरले जाते. तसेच नियमानुसार धान्य सुध्दा दिले जात नाही. त्यामुळे रेशनकार्डधारक व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात अनेकदा खटके उडतात. यामुळे अनेक रेशनकार्डधारक अर्ज करून दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानात आपले कार्ड जोडून त्या स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त धान्याची उचल करीत असतात.अशा आहेत तक्रारीलॉकडाऊनच्या काळात प्राधान्य तसेच अंत्योदय शिधा पत्रिकाधारकांना शासनाने विशेष बाब म्हणून एप्रिल ते नोव्हेंबर या काळात नियमित धान्याबरोबरच मोफत धान्याचा पुरवठा केला. मात्र, या काळात काही दुकानदारांनी काही लाभार्थ्यांना या धान्यापासून वंचित ठेवले. तसेच काही ठिकाणी मृत्यू झालेल्यांच्या नावावरही धान्य दिले.लॉकडाऊन काळात गरीब लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासनाने मोफत धान्य दिले़ मात्र, काही दुकानदारांनी या योजनेत भ्रष्टाचार केला. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने बोटावर मोजण्याएवढ्या दुकानांवर कारवाई केली.
जिल्ह्यात 9 हजार 542 रेशनकार्ड धारकांनी घेतला पोर्टेबिलिटीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 11:41 IST