गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. काही वेळेस हलक्या स्वरुपात पडणारा पाऊस कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. परिणामी वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मंगळवारी दिवसभर पाऊस झाल्यानंतर रात्री पावसाने विश्रांती घेतली. बुधवारी सकाळी मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. शहरासह परिसरात बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. रस्त्यावरील उंचसखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागले. तर देवपुरातील कॉलनी परिसरात पाण्याचे डबके आणि चिखलाचे साम्राज्य तयार झाले होते. पावसामुळे रस्त्यावरदेखील वर्दळ तशी कमीच होती.
सुरुवातीला आलेला पाऊस तसा बारीकच हाेता; पण नंतर पावसाने जोर पकडला. बराचवेळ पावसाने जोरदार हजेरी लावली. रस्ते जलमय झाले होते. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्यात पाणी साचले होते. वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागली होती. हंगामी व्यावसायिकांसह आग्रा रोडवरील लोटगाडीधारक व्यावसायिकांचे चांगलेच हाल झाले होते. देवपुरातील बऱ्याच काॅलनी परिसरात बऱ्याच ठिकाणी तर रस्तेदेखील नाहीत, त्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील रहिवाशांना घराबाहेर पडणेदेखील मुश्किल झाले होते. पावसाने दिवसभरात कधी जोरात तर कधी हलक्या स्वरूपात हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला होता.
व्यापारी संकुलात पाणी
शहरातील काही व्यापारी संकुलाची रचना ही तळघरापासून करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी मात्र पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाचा परिणाम हा व्यापारी संकुलावर मोठ्या प्रमाणावर झाल्याचे समोर आलेले आहे. बहुतेक व्यापारी संकुलाच्या तळघरात असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरले. काहींनी दुकाने उघडलीच नाहीत. तर काहींनी दुकाने सुरु ठेवली होती. परिणामी दुकानात पाणी शिरले आणि लाखों रुपयांचे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागले.
घरात शिरले पाणी
पावसाची संततधार ही सायंकाळपर्यंत कायम होती. त्यामुळे बहुतेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. त्यात मालेगाव रोडवरील अग्रवाल नगरचा काही भाग, लक्ष्मणवाडी, भाईजी नगराचा समावेश करता येईल. हा परिसर उंचसखल असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याने अनेकांच्या घरात शिरकाव केला. संसारोपयोगी साहित्य पाण्यात गेल्याने नुकसान झाले आहे.
रस्त्यावर साचले पाणी
पावसाची संततधार कायम असल्याने पाण्याचा निचरा बऱ्याच ठिकाणी झाला. पण, ज्या ठिकाणी गटारी असून त्या कधीही स्वच्छ न केल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा नव्हती. पाणी थेट रस्त्यावर आले हाेते. याशिवाय काही भागात गटारीच नसल्याचे समोर आले आहे. या दोन्ही कारणामुळे पावसाच्या पाण्याचे मोठमोठे डबके रस्त्यावर जमा झाले हाेते. तसेच रस्त्यावर खड्डे असल्याने त्यात पुन्हा भर पडली होती. पाणी त्या खड्ड्यात साचले असल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागली.
धुळे तालुक्यात अतिवृष्टी
पावसाची दिवसभर संततधार आणि मुसळधार आलेल्या पावसामुळे धुळे तालुुक्यात पावसाने ६५ मिमीची किमान सरासरी ओलांडली. त्यामुळे धुळे शहर, तालुक्यासह खेडे, सोनगीर आणि नेर मंडळात अतिवृष्टी झाल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. या ठिकाणी पिकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी शिरले हाेते. पिकांचेही नुकसान झाले आहे. धुळे तालुक्यात एकाच दिवशी ८८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.