परंडा : तालुक्यातील शेळगाव शिवारातून जनावरांसाठी कडबा घेऊन जाणाऱ्या ट्रकला विद्युत तारांच्या स्पर्श झाल्याने ठिणग्या उडून कडब्याने पेट घेतल्याची घटना रविवारी घडली. यात दीड हजार पेंढ्या कडबा जळून खाक झाला. यावेळी उपस्थित मजुरांच्या व शेतकऱ्यांच्या मदतीने ट्रकला लागलेली आग बोअरच्या पाण्याने विझवण्यात आली. यामुळे मोठे नुकसान टळले.
रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथील पोपट कडवकर यांच्या शेतातून दीड हजार कडब्याच्या पेंढ्या ट्रकमध्ये (क्र. एम.एच. ०६ जी-४९२८) भरून चापडगावकडे जात होता. हा ट्रक सायंकाळी साडेचार वाजता शेळगाव येथील बस थांब्याजवळ आला असता लोंबकळत्या वीज वाहक तारांमध्ये होऊन ठिणग्या ट्रकमधील कडब्यावर पडल्या. यामुळे कडब्याने पेट घेतला. यावेळी चालकाने ट्रक गावाबाहेरील शेतात नेऊन आतील कडबा मजुरांनी बाहेर काढला. शेतकरी लतिफ शेख यांनी शेतातील बोअर चालू करून पाण्याच्या साह्याने व कामगारांच्या धाडसेने कुठल्याही प्रकारची जीवित हानी होऊ न देता आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.