भूम : देशभरात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून, यामुळे अनलॉकनंतर रुळावर येत असलेल्या एसटी महामंळालादेखील याचा मोठा फटका बसत आहे. मागील महिनाभरात प्रवासी संख्या घटल्यामुळे बस फेऱ्याही कमी कराव्या लागल्या असून, यामुळे पाच ते सहा लाखांचे उत्पन्न तीन लाखापर्यंत आले आहे.
कितीही संकटे आले तरी न डगमगता सतत प्रवाशांच्या सेवेत असलेली लालपरी कोरोनापुढे मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविल्याने देश लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यात लालपरीची चाकेही रूतली. दरम्यान, अनलॉकनंतर टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले. एसटी महामंडळाने देखील हळूहळू ग्रामीण भागापर्यंत आपली सेवा पूर्वत सुरू केली. आता कुठे एसटीची सेवा सुरळीत सुरू झालेली असतानाच मागील दोन महिन्यांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे विविध क्षेत्रावर याचा परिणाम जाणवत आहे.
मागील काही महिन्यात एसटी महामंळाला प्रवासी सेवेतून दैनंनदिन पाच ते लाख लाख रुपये उत्पन्न सुरू झाले होते. जवळपास शंभर बस फेऱ्यांच्या माध्यमातून १२ हजार प्रवासी प्रवास करीत होते. दररोज २० हजार किलोमीटर ही लालपरी धावत होती. परंतु मागील महिन्यांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ कमी झाली आहे. सध्या येथील स्थानकातून ८० बसफेऱ्या सुरू असून, दररोज सुमारे आठ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून दैनंदिन उत्पन्न ३ लाखांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महामंडळ आर्थिक तोट्यात येताना दिसत आहे.
चौकट.......
वाहतूक मर्यादा, लॉकडाऊनची भर
गतवर्षी याच काळत ९ महिने लॉकडाऊन सल्यामुळे लालपरीचे चाके रुतली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. अनलॉकनंतर पुन्हा नव्या वेगाने लालपरी रोडवर धाऊ लागली होती. परंतु, पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे प्रशासनाने रविवारी जनता कर्फ्यू लागू केला. यामुळे रविवारी अनेक बस फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. शिवाय, सोलापूर जिल्ह्यात ५० टक्के प्रवासी वाहतुकीस परवानगी सल्याने तोही फटका महामंडळाला बसत आहे. शेजारच्या बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन जाहीर केल्याने बीडकडे जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द कराव्या लागत असून, आष्टी मार्गे जाणारी भूम-मुंबई गाडी कोणत्या मार्गे पाठवायची, असाही प्रश्न आगार प्रमुखांसमोर आहे.
कोट....
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम आता वाढू लागला आहे. इतर जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर होत असल्यामुळे बसेस पाठविण्यासाठी नियोजन करावे लागत आहे. पुन्हा प्रवासी संख्या कमी होत आहे. मिळेल त्या उत्पन्नावर आगाराचा कारभार सध्या सुरू आहे.
सत्यजीत खताळ, आगार प्रमुख