लोहारा : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले हे मनमानी कारभार करीत लोकप्रतिनिधींना अवमानकारक वागणूक देत आर्थिक मागणी करत असून, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी तालुक्यातील २३ सरपंचांनी बुधवारी केली होती. यानंतर गुरुवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने त्यांची बदली करण्याची मागणी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. यापाठोपाठ शुक्रवारी सरपंच परिषद मुंबईच्या प्रदेशाध्यक्षांसह शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, सरपंच हा गावगाडा चालवणारा गावचा लोकप्रतिनिधी आहे. ग्रामपंचायतीची सर्वच कामे ही पंचायत समिती मार्फत चालतात. त्यामुळे सरपंचांचा गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्याशी सातत्याने विकास कामाच्या निमित्ताने संबंध येतो. मात्र, लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले हे सतत सरपंचांना अरेरावी भाषा करतात. तसेच विकासकामाच्या कुठल्याही फाईलवर सह्या करण्यासाठी पैशाची मागणी करतात. ती मागणी पूर्ण न झाल्यास अपमानीत करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी. येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास सरपंच परिषद मुंबईच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव, मराठवाडा कार्याध्यक्ष रामराजे जाधव, जिल्हा समन्वयक मोहन पणुरे, ॲड. योगिनी देशमुख, राम राठोड, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, परवेज तांबोळी, संभाजी मुंसाडे आदी उपस्थित होते.