भूम : थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी विद्युत महावितरण कंपनीकडून थेट वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान हाेत आहे. या कारवाईच्या विराेधात भूम येथील गाेलाई चाैकात १ एप्रिल राेजी मल्हार आर्मी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय जनता पार्टी, जय हनुमान ग्रुप व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले.
काेराेनामुळे शेतकरी अडचणीत आहेत. असे असतानाच विद्युत कंपनीने सक्तीने वीज बिलांची वसुली सुरू केली आहे. ही माेहीम थांबविण्यात यावी, अशी सातत्याने मागणी हाेत आहे. असे असतानाही महावितरणकडून कारवाई सुरूच असल्याचे सांगत मल्हार आर्मी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय जनता पार्टी, जय हनुमान ग्रुप व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गुरुवारी भूम शहरातील गाेलाई चाैकात रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. हे आंदाेलन जवळपास दाेन तास चालले. या आंदाेलनामुळे वाहतुकीची प्रचंड काेंडी झाली हाेती. यावेळी मल्हार आर्मीचे सुरेश कांबळे म्हणाले की, मतदार संघातील शेतकरी अडचणीत आहेत. असे असतानाही सत्ताधारी सेनेचे आमदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आमदारांनी जनतेला वाऱ्यावर साेडले तरी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहाेत, असा विश्वास त्यांनी यावेळी दिली.
भाजपाचे महादेव वडेकर, आदम शेख, गोरख भोरे यांनीही सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टिका केली. भूम उपविभागाचे कार्यकारी अभियंता आर. एच. पवार यांनी खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करू, अशी ग्वाही दिल्यानंतर हे आंदाेलन मागे घेण्यात आले. यावेळी भाऊसाहेब कुटे, दिलीप सानप, शंकर खामकर, प्रशांत मोहिते, नवनाथ पाटील, समाधान बनसोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, राज्य सदस्य प्राचार्य बिभीषण भैरट व युवती महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रतीक्षा भरनाळे, वंचित अघाडीचे मुकुंद लगाडे आदी उपस्थित हाेते.