भूम : शिक्षण विभागाच्या वतीने आता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम राबविला जात असून, भूम तालुका शिक्षण विभागाच्या वतीने याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. यासाठी ५ जुलै रोजी भूम गटशिक्षणाधिकारी सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची झूम मिटिंगद्वारे कार्यशाळा देखील घेण्यात आली.
कार्यशाळेला मार्गदर्शन करताना शिक्षण विस्ताराधिकारी राहुल भट्टी म्हणाले, सेतू अभ्यासक्रम हा दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५ दिवसांचा ‘टाईम बॉण्ड ’ कार्यक्रम आहे. यामध्ये विद्यार्थीकेंद्रित, कृतीकेंद्रित, अध्ययन निष्पत्तीवर आधारित विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकतील, अशा कृतिपत्रिका देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सदरील कृतिपत्रिका शिक्षक, पालक, शिक्षक मित्र यांच्या मदतीने वहीमध्ये सोडवायच्या आहेत. सेतू अभ्यासक्रमाच्या ४५ दिवसांच्या कालावधीमध्ये दर पंधरा दिवसांनी विद्यार्थ्यांच्या तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत. शिक्षकांनी या चाचण्या ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यमापन होणे महत्त्वाचे असून, एकही विद्यार्थी यापासून वंचित राहू नये, असे सांगण्यात आले. कार्यशाळेला केंद्रप्रमुख उगलमुगले, साधनव्यक्ती योगिराज आमगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक ऑनलाईन सहभागी झाले होते. आभार विस्ताराधिकारी राहुल भट्टी यांनी मानले.
050721\4001img-20210705-wa0092.jpg
गटशिक्षण विभागाच्या वतीन सेतु अभ्यासक्रमाबाबत ऑनलाइन कार्यशाळा सुरु आसतानाचे छायाचित्र