उस्मानाबाद : नाट्य प्रशिक्षणात नाटकाकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन विकसित होत असतो. नाट्य प्रशिक्षण ही आत्मशोधाची सुरुवात असते, यातूनच कलावंताचे व्यक्तीमत्व घडते, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या येथील उपपरिसरातील नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘नाट्यमंथन’ महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. येवले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर, संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड, संयोजक डॉ. गणेश शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. येवले म्हणाले, संतांची व कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या गेलेल्या मराठवाड्याने मराठी नाटक, चित्रपट व संगीत क्षेत्रात अनेक नामवंत लोक दिले. अलीकडील काळात नाट्यक्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठे बदल झाले असून, संशोधनाच्या संधीदेखील वाढल्या आहेत. उस्मानाबाद, तुळजापूर परिसरानेदेखील राज्याला अनेक लोककलावंत दिले आहेत. आगामी काळात युवा कलावंतांसाठी आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील, असेही ते म्हणाले. ‘कोविड‘मुळे नाटय व चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसला असून, ‘जेटीटी’सारखे नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. युवा कलावंतांनी नव्या - जुन्यांची सांगड घालून करिअर घडवावे, असे आवाहनही डॉ. येवले यांनी केले.
या महोत्सवात ५ ते १३ जुलै या दरम्यान डॉ. संजय पाटील, डॉ. सतीश पावडे, प्रा. मंगेश बनसोड, प्रा. अशोक बंडगर, प्रा. किशोर शिरसाठ, डॉ. गणेश चंदणशिवे, डॉ. संयुक्ता थोरात, प्रा. प्रवीण भोळे आदींची व्याख्याने होणार आहेत. प्रास्ताविक डॉ. गणेश शिंदे यांनी केले, तर हिंमतसिंग नेगी यांनी सूत्रसंचालन केले. यशोदा आहेर यांनी आभार मानले.