बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने ओबीसी स्थानिक संस्था राजकीय आरक्षण व मुस्लीम समाज शैक्षणिक आरक्षणाला समर्थन दर्शविण्यासाठी राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. गुरुवारी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या जिल्हा कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारकडून मराठा आरक्षण, मागासवर्ग कर्मचारी पदोन्नती, ओबीसी स्थानिक संस्था आरक्षणाचा असो अथवा मुस्लिमांच्या शैक्षणिक आरक्षणाचा मुद्दा, भटके-विमुक्तांच्या क्रीमी लेअर मर्यादा किंवा अटीचा प्रश्न प्रलंबित ठेवले जात आहे. हे प्रश्न प्रलंबित ठेवण्यात व चिघळविण्यात पूर्व भाजप सरकारचा त्यात वाटा अधिक असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. मागावसर्गाच्या ३३ टक्के पदोन्नती आरक्षणाचा रद्द करण्याचा निर्णय तसेच ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणाबाबत राज्य कायद्यात सुधारणा न केल्याने स्थानिक संस्थानिहाय ओबीसी आकडेवारीअभावी आरक्षण गेले. तसेच मुस्लीम समाजाच्या ५ टक्के आरक्षणासंदर्भातही सरकार गप्प असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.
यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम गवळी, आप्पासाहेब सिरसाटे, अरुण कदम, करीम पटेल, अविनाश गवळी, लक्ष्मण भोसले, रवि गवळी, राजकिरण गवळी, किशोर सिरसाटे, कानिफनाथ देवकुरळे आदी उपस्थित होते.