मागील वर्षीपेक्षा या वर्षी गॅसच्या किमती दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान वाढल्या आहेत. त्यातच सबसिडीच्या नावाखाली सात-आठ रुपयेच खात्यावर येत असल्याने, गॅसच्या मूळ किमतीमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट आहे. या वर्षी जानेवारी ते जुलैपर्यंत गॅसच्या किमतीत शंभर ते दीडशे रुपये वाढ झाली आहे.
ग्रामीण भागात चुलीचा पर्याय असला, तरी पावसाळ्यामुळे सरपणही ओले राहत असल्याने चूल पेटत नाही अन् गॅस महाग झाल्याने पेटवू वाटत नाही, अशी भावना ग्रामीण भागातील गृहिणीमधून व्यक्त होते आहे.
कोरोनाने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण केला असताना, केंद्र सरकारने गॅस व इंधनाचे दर वाढवून सर्वसामान्यांना मोठ्या संकटात टाकले आहे. स्वयंपाकघराचे बजेट महागाईने आधीच कोलमडून गेले असताना, गॅसचे भाव वाढवून त्यात आणखी भर टाकली आहे. ही दरवाढ मागे घेऊन सरकारने सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.
- ज्योती सपाटे, सामाजिक कार्यकर्त्या, कळंब
गॅसचे भाव वाढवले जात असताना सरकारने सबसिडी एकदम कमी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसला आहे. सरकारने एकतर दर कमी करावेत तसेच सबसिडी वाढवून द्यावी. लोकांच्या उत्पनात कोरोनामुळे फरक पडला असल्याने गॅस खरेदी करावा का नाही? असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.
-शैला चोंदे, बचत गट अध्यक्ष, कळंब
गॅसच्या किमती आमच्या हाताबाहेर चालल्या आहेत. सहाशे रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर साडेआठशे रुपयांना झाला आहे. त्यात पुन्हा सबसिडीच्या नावाने बोंबाबोंबच आहे. लाभार्थ्यांना सबसिडीच्या नावाखाली पाच-सात रुपये दिले जात आहेत. ही एक प्रकारची कुचेष्टाच आहे. कोरोनाच्या संकटामुळे पुरेसा रोजगार नाही. मिळाला, तरी पुरेसे उत्पन्न नाही. त्यातच महागाईने प्रचंड बेजार केले आहे. अशा स्थितीत गॅस दरवाढीची भर पडली आहे. त्यामुळे पुन्हा चुली पेटविण्याची तयारी गृहिणींनी सुरू केली आहे. परिणामी, धूरमुक्ती हे दिवास्वप्नच राहून जाईल. गॅसच्या किमती अशाच वाढू लागल्या, तर ग्रामीण भागात त्याचा वापर जवळपास बंदच होऊन जाईल.
- राणी ताकपिरे, गृहिणी, बोर्डा
डिसेेंबरमध्ये सर्वाधिक दरवाढ...
गेल्या वर्षभरात गॅसचे दर सातत्याने बदलत राहिले आहेत. या कालावधीत घरगुती गॅसच्या किमतीत एकाच वेळी ७७ रुपयांची दरवाढ ही डिसेंबर, २०२० मध्ये झाली. त्यानंतर, यंदाच्या मार्चमध्येही जवळपास ७० रुपयांची वाढ झाली. आता जुलैमध्ये २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.