भूम : तालुक्यात तुती लागवडीची कामे वगळता एमआरईजीएस अंतर्गत एकही काम तालुक्यात सुरू नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कामे सुरू करण्याबाबत प्रशासनच उदासीन असल्याचा आरोप मजुरांमधून होऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक मंदीचे सावट असल्याने किमान कोरोनाचे नियम पाळत रोहयो अंतर्गत कामे सुरू करा, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात सध्या विविध ठिकाणी ५५ तुती लागवडीची कामे सुुरू असून, त्या कामांवर २८५ मजूर आहेत. गत दोन वर्षांपासून कामे नसल्याने मजुरांची मोठी अडचण झाली आहे. अशा परिस्थितीत मातीनाला बांध, बांध बंदिस्ती, फळबाग लागवड, पडिक जमिनीवर वृक्ष लागवड, रस्त्याची नवीन कामे सुरू करण्याची गरज मजुरांमधून व्यक्त केली जात आहे. तालुक्यात ४० रस्ते अतिक्रमणमुक्त झाले असून, या रस्त्यावर माती कामे झाली आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्यावर खडीकरणाची कामे सुरू केली तरच जिल्हाधिकारी यांनी राबविलेल्या मोहिमेचा उपयोग होणार असून, या माध्यमातून मजुरांना कामेदेखील उपलब्ध होऊ शकतील, असे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
तालुक्यात नोंदणीकृत २२ ते २५ हजारांच्या जवळपास मजूर आहेत. पंरतु, सद्यस्थितीत केवळ तुती लागवडीची ५५ कामे वगळता एकही काम नसल्याने कोरोना काळात मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तालुक्यात डोंगराळ भाग अधिक असून, पडीक जमिनीवर वृक्ष लागवडीचीदेखील कामे सुरू होऊ शकतील, असे काही मजुरांचे म्हणणे आहे.
कोट.........
सध्या मजुरांची कामाची मागणी नाही. परंतु, कुणी मागणी केली तरी पंचायत समिती स्तरावर व इतर यंत्रणेकडून सुरू असलेल्या कामांकडे ही मागणी वर्ग करून त्यांना कामे उपलब्ध करून देता येऊ शकतील.
-उषाकिरण श्रृंगारे, तहसीलदार, भूम
गेल्या दोन वर्षांपासून महसूल प्रशासनाकडून एमआरईजीएसची कामे सुरू नाहीत. तुती लागवड सोडून इतर कामे सुरू करावीत, अशी मजुरांची मागणी आहे. कोरोनाचे नियम पाळून कामे सुरू केली तर मजुरांची उपासमार थांबेल.
- राजकुमार घरत, आष्टा, ता. भूम
चौकट
पं.स.च्या कामावर ५६३ मजूर उपस्थिती
पंचायत समिती यंत्रणामार्फत मोठ्या प्रमाणात कामे सुरु करण्याची गरज आहे. परंतु, येथेही थोड्या फार प्रमाणात कामे सुरु आसल्याने मजुराची उपासमार सुरू आहे. सार्वजनिक विहिरींची दोन व रस्त्यांची केवळ तीन कामे सुरू असून, वैयक्तिक लाभाच्या कामात घरकुलाची २८, गोठ्याची २६ आणि सिंचन विहिरींची २६ कामे करण्यात येत आहेत. यावर ५६३ मजूर काम करीत आहेत.