पारगाव - वाशीसह परिसरात सध्या बीड जिल्ह्यातून वाळूची अवैधरित्या वाहतूक सुरू आहे. ही माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार सुजाता हंकारे यांनी रविवारी सकाळी पिंपळगाव (क.) शिवारात दाखल हाेत एक टेम्पाे पकडला. या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाशी तालुक्यातील पारगावसह पारा, जनकापूर, पिंपळगाव, हातोला, पांगरी, जेबा या मांजरा नदीच्या पट्ट्यालगत असलेल्या बीड जिल्ह्यातील गावांतून वाळूची अवैधरित्या वाहतूक होत आहे. मागील काही दिवसांत हे प्रमाण वाढले हाेते. दरम्यान, अवैध वाळू वाहतुकीच्या अनुषंगाने माहिती मिळाल्यानंतर रविवारी सकाळीच नायब तहसीलदार सुजाता हंकारे यांनी वाशी तालुक्यातील पिंपळगाव (क.) येथे दाखल झाल्या. त्यांनी सापळा रचून टेम्पाे (क्र. एमएच.०४-एफयु.७०३७) पकडला. तर एक ट्रॅक्टर घटनास्थळावरून पसार झाला, अशी चर्चा आहे. पकडलेल्या टेम्पाे जप्त करून वाशी तहसील कार्यालयाच्या आवारात उभा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई वाशीचे तहसीलदार नरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुजाता हंकारे, पारगावचे मंडळ अधिकारी एस. बी. उंदरे, पिंपळगाव (क) तलाठी एस.एस.इंगळे, के. एस. उंदरे, ए. आर. साबळे, व्ही. आर. सूर्यवंशी, जे. डी. पाचकुडवे यांच्या पथकाने केली.