मंगळवारी दुपारी मांजरा प्रकल्प भरल्यानंतर लागलीच उजव्या कालव्यातून विसर्ग करण्यात आला होता. दरम्यान, प्रकल्प क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने आवक कायम राहण्याची शक्यता गृहीत धरून बुधवारी सकाळी मांजराचे सहा दरवाजे उघडून १.४९ क्युसेक वेगाने मांजरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील शेतीला वरदान ठरणाऱ्या व लातूर, कळंब, अंबाजोगाई, केज अशा अनेक शहरांची तहान भागविणारे मांजरा धरण यंदा सलग दुसऱ्या वर्षी भरले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या दखलपात्र पावसाने या प्रकल्पात चांगली आवक झाली होती. यात सातत्यपूर्ण वृद्धी होत गेल्याने अखेर मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास २२४.०९३ दलघमी क्षमतेचा मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. यानंतर काठोकाठ भरलेल्या या प्रकल्पातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणे गरजेचे झाले होते. त्यामुळे याच दिवशी उजव्या कालव्यातून १.२७ घनमीटर प्रतिसेंकद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र, दरम्यानच्या काळात पाणलोट क्षेत्रात ढगांची वर्दळ वाढत पावसाला सुरुवात झाली. यामुळे पाण्याची आवक व विसर्ग यात समतोल साधण्यासाठी दरवाजांनी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रकल्पाखालील भागातील नदीकाठच्या गावांना आधीच सतर्क करण्यात आले होते.
मांजरा प्रकल्प तुडुंब, सहा दरवाजांद्वारे विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST