लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त बुधवारी गावातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या रॅलीला प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष सिन्हा यांनी हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी बोलताना प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी म्हणाले, दोन आठवड्याहून अधिक काळ खोकला, ताप, रात्रीचा येणारा घाम, ताप, वजनात लक्षणीय घट, छातीत दुखणे, थुंकीवाटे रक्त पडणे, मानेला कातडीखाली आलेल्या न दुखणाऱ्या गाठी यापैकी कोणतीही एक लक्षण असल्यास संशयित क्षयरोग म्हणून तपासणी करून घ्यावी. सरकारी दवाखाने व सास्तूर ग्रामीण रुग्णालयात तपासणी व उपचार मोफत आहेत. उपचार घेत असलेल्या क्षय रुग्णास क्षयरोग विभागाकडून दर महा पाचशे रुपये पोषण आहारा करिता देण्यात येतात, असेही त्यांनी सांगितले. या रॅलीमध्ये स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, गावातील सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाली होते.