संजय कुलकर्णी , जालनामिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होत आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावणे सुरू केले असून खुल्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना व भाजपाचे प्रत्येकी १५ असे ३० सदस्य विजयी झालेले आहेत. पक्ष प्रणित व २ अपक्षांच्या बळावर शिवसेनेकडून १८ सदस्यांचा दावा केला जात आहे. तर भाजपाकडूनही अपक्षांच्या सहाय्याने १६ सदस्य संख्येचा दावा केला जात आहे. पहिल्या अडीच वर्षात सेनेकडे अध्यक्षपद तर भाजपाकडे उपाध्यक्षपद गेल्याने आता पुन्हा काही बदल होणार का, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र सदस्य संख्येच्या बळानुसार अध्यक्षपद आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे. मात्र भाजपातील अध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या संख्येत वाढ होत आहे. ५५ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत युतीकडे बहुमत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सदस्यांनी विरोधी बाकावर बसण्याची तयारी ठेवली आहे. मात्र ‘जर...तर’ च्या गणितावरही हे सदस्य लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी दोनवेळा अध्यक्षपद व एकवेळा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेले सेनेचे अनिरूद्ध खोतकर, संभाजी उबाळे हे इच्छूक आहेत. तर भाजपातून उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्याबरोबरच भगवानसिंह तोडावत, रामेश्वर सोनवणे हेही इच्छूक आहेत. सभापती म्हणून अडीच वर्षात काम पाहिलेल्या वर्षा देशमुख व शीतल गव्हाड यांनी अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली नसली तरी त्यांचे समर्थक प्रयत्नशील आहेत.प्रत्यक्षात कोणताही सदस्य आपण इच्छुक असल्याचे सांगत नाही.गेल्या अडीच वर्षांच्या काळात विद्यमान पदाधिकाऱ्यांनी केलेली कामे, प्रलंबित राहिलेली कामे इत्यादी बाबीही आता प्रकर्षाने समोर येत आहेत. मागील काळात निधी खर्च करण्यास काहीसा झालेला विलंब, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक ठेवला किंवा नाही याही बाबी चर्चिल्या जात आहेत. त्यातून अध्यक्षपदासाठी कुणाचे नाव पुढे करायचे, हे अद्याप युतीच्या नेत्यांनी ठरविलेले दिसत नाही. मात्र सक्षम नेतृत्व देण्याचा विचार नक्कीच सुरू असणार, हे निश्चित !१९ आॅगस्ट रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्षपदाच्या मुद्यावरून विरोधी पक्षाचे गटनेते सतीश टोपे यांनी सत्ताधाऱ्यांवर चौकार लगावला होता. अध्यक्षपदासाठी इच्छुकांची लगीनघाई सुरू असल्याचे ते म्हणाले होते. खोतकर, तोडावत आणि लोणीकर हे तिघेही इच्छूक असल्याचे अप्रत्यक्षरित्या त्यांनी सभागृहासमोर सूचित केले होते. ४विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता केव्हा लागते, याकडे सर्वांचे लक्ष असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होत आहेत. त्यामुळे सेना-भाजपाच्या नेतेमंडळींमध्ये एकमत होणारच, अशी खात्री इच्छुकांमधून व्यक्त केली जात आहे. मात्र कोणत्या नावावर एकमत होणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लावणार, हाही मुद्दा चर्चिला जात आहे.
झेडपी अध्यक्षपदासाठी इच्छुकांची लगीनघाई !
By admin | Updated: September 1, 2014 01:06 IST