वाळूज महानगर : शिक्षकाने मारहाण केल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला मारहाण केल्याची घटना शनिवारी वाळूज परिसरातील लांझी येथे घडली. मात्र, मयत विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला आहे. लांझी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कलीम उमर शेख यांनी इयत्ता तिसरीमधील विद्यार्थी बाबासाहेब संतोष खंडागळे (९) याला गुरुवार ११ सप्टेंबर रोजी अभ्यास न केल्यामुळे मारहाण केली होती. १२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान बाबासाहेब तापाने फणफणत होता. आज १३ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजेच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास शिक्षक कलीम यांनी मारहाण केल्यामुळेच बाबासाहेबचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत गावातील २५-३० जणांच्या जमावाने शाळेत जाऊन कलीम यांना मारहाण केली, तसेच त्यांना २ तास कोंडून ठेवले. इतर शिक्षकांनी मध्यस्ती केल्याने पुढील अनर्थ टळला. संतप्त जमावाने शाळेत येऊन एका शिक्षकाला मारहाण केली, तरी मुख्याध्यापिका कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे सौजन्यही दाखविले नाही. या संदर्भात शिक्षक कलीम उमर शेख यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बाबासाहेब सतत शाळेत गैरहजर राहत होता. अभ्यासही करीत नसायचा. त्यामुळे त्याला थोडीशी शिक्षा केली. मात्र, तो आजारी असल्याचे माहीत नव्हते.
जि.प. शिक्षकाला मारहाण
By admin | Updated: September 14, 2014 00:21 IST