लोकमत न्यूज नेटवर्कम्हाळसा सावंगी : जिंतूर तालुक्यातील सावळी बु. येथील एका ओढ्यातून पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेला येलदरी कॅम्प येथील युवक बचावला आहे. ही घटना येलदरी-इटोली दरम्यान १४ सप्टेंबर रोजी सकाळीच्या सुमारास घडली.जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथील गादी बनविण्याचे काम करणारा शेख एजाज शेख अजीज (वय ३०) हा युवक १४ सप्टेंबर रोजी इटोली येथील ग्राहकांना गादी देऊन एम.एच.२२-८०७ या दुचाकीवरून परत येलदरीकडे येत होता. त्यांची दुचाकी सावळी बु. येथील ओढ्याजवळ आली असता ओढ्यातील पुलावरून येलदरी शिवारात पडलेल्या पावसाचे पाणी वाहत होते.या पुलावरून शेख एजाज यांनी दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने शेख एजाज यांचा दुचाकीवरील ताबा सुटत होता. समयसुचकतेने दुचाकीवर असलेली दोर काठावर असलेल्या ग्रामस्थांकडे फेकला. ग्रामस्थांनी दोर धरून ठेवला. परंतु, दुचाकी वाहून गेली.तसेच हातातील दोर सुटल्यामुळे शेख एजाजही पाण्यामध्ये वाहत गेला. त्याला ओढ्याच्या काठावरील ग्रामस्थांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, यश आले नाही. तोपर्यंत शेख एजाज हा अर्धा कि.मी. अंतरापर्यंत वाहत गेला. नशिब बलवत्तर म्हणून शेख एजाज याला पोहता येत असल्याने पाण्यातील अंतर पार करीत तब्बल एका तासानंतर शेख एजाज बाहेर आला. शेख एजाज याची प्रकृती चांगली असून शरीरावर किरकोळ जखमा झाल्या आहेत.दरम्यान, तब्बल सहा तासानंतर वाहून गेलेली दुचाकी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली.
पुरात वाहून गेलेला युवक बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:52 IST