येलदरी : येलदरी धरणामध्ये मागील आठ दिवसांत झालेल्या पाणी पातळीच्या वाढीमुळे परभणी जिल्ह्यासह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे़ पाणी पातळीत वाढ झाल्याने सिंचनालाही यावर्षी चांगले पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे़ यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने १ सप्टेंबरपर्यंत धरणात केवळ ३८ टक्के पाणीसाठा होता़ त्यामुळे यंदा भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल असे दिसत होते़ येलदरी धरणावर सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असणाऱ्या गावांची संख्या मोठी आहे़ पिंपळगाव काजळे २३ गाव पाणीपुरवठा योजना, जिंतूर शहराची पाणीपुरवठा, परभणी, वसमत यासह जवळपाच्या अनेक खेड्यांमध्ये धरणातील पाण्यावरच पिण्याच्या पाण्याचे नियोजन अवलंबून असते़ कमी पावसामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असे चिन्हे दिसत होती़ परंतु, विदर्भात झालेल्या जोरदार पर्जन्यमानामुळे खडकपूर्णा धरण पूर्णपणे भरले़ याचाच परिणाम धरणातील पाणी येलदरी धरणात सोडल्यामुळे पाणी पातळी २० टक्क्यांनी वाढली़ वाढलेल्या पाणीपातळीमुळे भविष्यात निश्चितच अनेक गावांचा पाणी प्रश्न निकाली निघणार आहे़ (वार्ताहर)
येलदरी धरणाच्या पाणीपातळीत वाढ
By admin | Updated: September 13, 2014 00:11 IST