फुलंब्री : तालुक्यातील निधोना ते दरेगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम ठेकेदाराने गेल्या चार महिन्यांपासून बंद करून अर्धवट ठेवलेले असल्याने याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
निधोना ते दरेगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाला जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळाली होती. ठेकेदाराने मातीकामही केले. पण तेही अर्धवट अवस्थेत पडले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पट्टे भरणे, नळकांड्या टाकणे, डांबरीकरण करणे आदी कामे बाकी आहेत. ही कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच करणे आवश्यक आहे. पण सबंधित ठेकेदार व जिल्हा परिषदेचे अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत.
तीनशे नागरिकाची होणार अडचण
रस्ता डोंगराकडे जाणारा आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी गावाच्या दिशेने येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात लोक वस्ती करून राहतात. डांबरीकरण करण्यापूर्वी हा रस्ता चिखलमय झाला. तर वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांची ये-जा करण्याची गैरसोय होणार आहे. अर्धवट राहिलेले काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी सरपंच बिजूबाई राऊतराय, उपसरपंच सुभाष राऊतराय, देवीदास गाडेकर, शेख मोईन यांनी केली आहे.
फोटो : निधोना ते दरेगाव जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट आहे. कडेला ठेवलेल्या पुलाच्या नळकांड्या दिसत आहेत.
120521\12_2_abd_125_12052021_1.jpg
निधोना - दरेगाव रस्त्याचे काम अर्धवट