तुळजापूर : एका महिलेचा गळा आवळून खून करीत पोत्यात बांधून प्रेत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे़ मयत महिला ही अनोळखी असून, तिचे पार्थिव सोमवारी सकाळी वडगाव लाख (ता़तुळजापूर) जवळील एका पुलाखाली आढळून आले़ या प्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी सांगितले की, वडगाव लाख गावाजवळील एका पुलाखाली सोमवारी सकाळी एका अनोळखी महिलेचा (वय-३५ ते ४०) मृतदेह आढळून आला आहे़ प्रेत पोत्यात बांधलेले असल्याने दुर्गंधी सुटली होती़ नागरिकांनी ही माहिती सरंचांना दिली़ सरपंचांनी घटनास्थळाची पाहणी करून खात्री झाल्यानंतर पोलिसांना माहिती दिली़ माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेवून पंचनामा केला़ यावेळी महिलेच्या अंगावर मारहाणीच्या जखमा नसून, तिचा गळा स्कार्पने आवळून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत बरदाना पोत्यात बांधून फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे़ पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांकडे महिलेबाबत चौकशी केली असता तिची ओळख कोणासही पटली नाही़ मयताच्या पार्थिवाचे ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले़ या प्रकरणी पोहेकॉ प्रशांत सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेचा अधिक तपास पोनि ज्ञानोबा मुंढे हे करीत आहेत़
महिलेचा गळा आवळून खून
By admin | Updated: February 10, 2015 00:30 IST