औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. यात आता ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर हे यंत्र पुढे आले आहे. हवेतील ऑक्सिजन हे यंत्र रुग्णांपर्यंत पोहोचविते. ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णालयात खाटा नाहीत, अशा परिस्थितीत हवेतील ऑक्सिजन जमा करणारे यंत्र जीव वाचवेल का? ‘ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर यंत्र’ जीवरक्षक आहे का? यावर विविध तज्ज्ञांशी, डाॅ. मंगला बोरकर यांनी केलेली चर्चा.
-----
डाॅ. एस. एच. तालीब, ज्येष्ठ अतिविशेषोपचार तज्ज्ञ, प्राध्यापक ए मेरीट्स औषधवैद्यकशास्त्र.
- हवेत ऑक्सिजनचे प्रमाण २१ टक्के असते आणि नायट्रोजनचे प्रमाण ७९ टक्के. ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर छोट्या सुटकेसएवढे यंत्र, विजेवर चालते. हवेला ओढून घेते. नायट्रोजनला बाहेर टाकते. ऑक्सिजन साठवते. या यंत्राच्या नळीला मास्क, नेझल प्राँग लावून रुग्णाला मिनिटाला ८ लीटरपर्यंत ऑक्सिजन देता येतो. रग्णालयात खाट मिळेपर्यंत, सुट्टी मिळाल्यानंतर कमी प्रमाणात आवश्यकता असल्यास हे घरच्या घरी वापरता येते. अलीकडे काही जण मात्र, काॅन्सन्ट्रेटरच्या नावाने नेब्युलायझर किंवा ह्युमिडीफायर्स विकत आहेत. अशी फसवणूक करणाऱ्यापासून जपून राहा.
--------
डाॅ. आनंद निकाळजे, अतिविशेषोपचार तज्ज्ञ
- ज्यांना २ ते ७ लीटर्स ऑक्सिजन घरी लागते किंवा रुग्णायलयातील स्थिर रुग्णांना हे यंत्र उपयोगी आहे. कारण त्याला ऑक्सिजनचा पुरवठा लागत नाही. अचानक ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला तर व्हेंटिलेटरवर नसलेल्या रुग्णांना उपयोग होऊ शकतो. परंतु यामध्ये बॅटरी नसते. वीजपुरवठा अत्यावश्यक आहे.
----
डाॅ. अनंत कुलकर्णी, फिजिशियन, अतिविशेषोपचार तज्ज्ञ
- घरी ऑक्सिजन देण्यास उपयुक्त.
-ऑक्सिजन सिलिंडर आणा, बदला, रिकामे भरून घ्या, यापासून सुटका.
-मात्र, वीजपुरवठ्यात खंड नको किंवा जनरेटर हवा. इन्व्हर्टरवर चालत नाही.
------
डाॅ. विशाल ढाकरे, फिजिशियन, अतिविशेषोपचार तज्ज्ञ
- या यंत्राने घरी ७ -८ लीटर प्रतिमिनिटप्रमाणे ऑक्सिजन देणे शक्य आहे. ३ ते ४ तासांनी हे यंत्र गरम होते आणि अर्धा - एक तास बंद ठेवावे लागते. जर ऑक्सिजन अखंडित आवश्यक असेल तर मधल्या गॅपमध्ये ऑक्सिजन सिलिंडर किंवा दुसऱ्या यंत्राची व्यवस्था हवी. २५ ते ५० हजारांना मिळणाऱ्या या यंत्राची किंमत आता अचानक दुप्पट किंवा जास्त झाली आहे. याचा पण तुटवडा होण्याची भीती आहे.
----
डाॅ. शैलजा राव, सहयोगी प्राध्यापक, वार्धक्यशास्त्र विभाग, घाटी
- माझ्या वयस्क नातेवाइकांना गेल्या ऑगस्टला तीव्र स्वरूपाचा कोविड झाला व फुप्फुसांना दीर्घकालीन इजा झाली. त्यांना आता मधूनमधून ३ ते ४ लीटर ऑक्सिजन प्रति मिनिट लागतो. ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरवर त्यांचे व्यवस्थित चालले आहे.
------
डाॅ. रमेश बाहेती, कन्सल्टंट
- माझा स्वत:चा अनुभव. हे यंत्र सहज वापरता येते. कार किंवा रुग्णवाहिकेतून नेता येते. यूपीएसवर चालू शकते. गंभीर रुग्ण जर सुट्टी होऊन घरी गेला तर त्याला बऱ्याचदा हालचाल केल्यानंतर ऑक्सिजनची गरज भासते. ऑक्सिजनच्या अभावाने हृदय थांबू शकते. अशांना हे यंत्र अत्यंत उपयोगी आहे.
------
एक ज्येष्ठ डाॅक्टर
- माझ्या आईला कॅन्सरसाठी औषध सुरू आहे. मध्यम तीव्रतेचा कोविड होऊन ती घरी आली. तेव्हा तिचे ऑक्सिजन काठावर होते, म्हणून मी भाड्याने ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर आणला. पण तो एक दिवसात बंद पडला. विकत घ्यायला गेले तर अव्वाच्या सव्वा किंमती सांगायला लागले. शासनाने या जीवरक्षक यंत्राच्या किमतीवर, काळाबाजार आणि साठेबाजीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.