महापालिका आयुक्त पी.एम. महाजन यांना मनपात रुजू होऊन ३ जानेवारी २९१५ रोजी चार महिने पूर्ण झाले आहेत. या चार महिन्यांच्या काळात त्यांच्याकडून महत्त्वाचे असे कुठलेही काम झालेले नाही. मात्र, त्यांचा बोलताना जाणारा तोल वादाला कारणीभूत ठरत असल्याने रुजू झाल्यापासून आजवर ते फक्त टीकेचे धनी ठरत आहेत. शेवटी ‘महाजन को गुस्सा क्यों आता है’ याचाच शोध घेण्यात सर्व जण लागले आहेत. त्यांना राग आल्यावर ते अवतीभोवती कोण आहेत हे विसरून जातात आणि अहिराणी भाषेत काहीही बोलून जातात. त्यांना राग का येतो हे कळण्यास मार्ग नाही; परंतु त्यांच्या अर्वाच्य बोलण्याचे दुष्परिणाम मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेवर आणि या शहराच्या विकासावर होत आहेत. चार महिन्यांत शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. पथदिवे बंद आहेत. रस्त्यांच्या कामांना ब्रेक लागलेला आहे. नवीन विकासकामे होत नाहीत. मनपाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे सांगून सर्व जण वेळ मारून नेत असल्याचा आरोप प्रशासनावर होतो आहे. आयुक्तांना कोण सल्ला देत आहे आणि ते कुणाच्या सल्ल्याने वागत आहेत हेच कळत नाही. ७ ते ८ महिन्यांवर त्यांची सेवानिवृत्ती आली आहे. त्यामुळे अधिकारीदेखील त्यांना जास्त दाद देत नसल्याचे दिसून येते. धुळ्याला ते जिल्हाधिकारी असताना तेथील कार्यकाळही त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे गाजला. तोच पाढा येथेही वाचण्याचा प्रयत्न आयुक्त करीत आहेत; परंतु त्याचे परिणाम वेगळे होऊ लागले आहेत. विकासकामांच्या संचिका मंजूर करूच नयेत. हा आयुक्तांचा स्वत:चा निर्णय नव्हता. आयुक्तांना हा सल्ला देण्यामागे मनपातील काही अधिकारीच आहेत. त्यामुळे आयुक्तांनी संचिकांकडे कानाडोळा करण्यास सुरुवात केली. त्याचा पहिला उद्रेक झाला तो नगरसेवक अमित भुईगळ यांच्या रूपाने. भुईगळ, प्रमोद राठोड, मिलिंद दाभाडे यांच्यात व आयुक्तांमध्ये शिवीगाळ होईपर्यंत वाद झाला. त्यावेळी आयुक्त चिडून म्हणाले की, मी काही तुमचा सालदार नाही. त्यांच्या या वक्तव्यावरून नगरसेवकही चिडले. त्यानंतर मनपातील एक अधिकारी आयुक्तांकडे लग्नपत्रिका घेऊन गेला. त्या अधिकाऱ्यावरच आयुक्त चिडले. कशाला आवतन देता म्हणून अधिकाऱ्याला शाब्दिक टोले दिले. सर्वसाधारण सभागृहातील चेंबरमध्ये ‘या बायांना (नगरसेविकांना) बसायला जागा द्या’, घरातील संसार करताना अनावश्यक खर्च करता का, असे शब्द वापरल्यामुळे त्यांना बांगड्यांचा अहेर मिळाला. बैठकीमध्ये ते अधिकाऱ्यांना शिवराळ भाषेत बोलतात. त्यामुळे दालनात जाण्यापूर्वी अधिकारी दहा वेळेस विचार करीत आहेत. बंगल्यावरील सेवेकऱ्यांचा तर दररोज मानसिक छळ होतो आहे. लिफ्टमनलादेखील आयुक्तांच्या रोषाला बळी पडावे लागले आहे. चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी कधी नव्हे ते दिवाळसणात सामूहिक रजेवर गेले. परिणामी, शहरात कचरा साचला. नागरिक एखाद्या कामासाठी भेटण्यासाठी गेल्यावर थेट त्यांच्यावर घसरतात. राजकीय दबाव आणून माझ्याकडून कामे करू न घेता का? अशा भाषेत नागरिकांना ते सुनावतात. शुक्रवारच्या घटनेचा विचार केला तर आयुक्त सकाळी मनपात येतानाच संतापलेले होते. त्यामुळे त्याच्यापुढे काय घडले हे सर्वांसमोर आले आहे. भाजपाचे गटनेते संजय केणेकर यांची प्रतिमा वादग्रस्तच आहे. गेल्यावर्षी थर्टीफर्स्टच्या दिवशी ते व खा. चंद्रकांत खैरे यांच्यात झालेला वाद सर्वश्रुत आहे. पालिकेत युती असताना त्यांनी केलेली विधाने वादाला कारणीभूत ठरतात, तर आयुक्तांचा धुळ्यातील कार्यकाळ वादग्रस्तच राहिलेला आहे. त्यामुळे दोन वादग्रस्त व्यक्तींचा तोल जाणे सहज शक्य आहे. यामागे शहरविकासाचे कारण नव्हते. शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोघांमध्ये शिवराळ भाषेत संभाषण झाले. यातून एक नवी संस्कृती (?) महापालिकेत येत आहे. आता अपेक्षा कुणाकडून कराव्यात मनपातील सत्ताधाऱ्यांना जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यात अपयश आले आहे. नागरिकांना आता माध्यमांकडूनच अपेक्षा आहे. निदान समस्यांना वाचा फोडण्याची ताकद तरी लोकशाहीमुळे माध्यमांकडे आहे; परंतु माध्यमांवरच घसरून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रकार पालिकेतील आयुक्त, अधिकारी आणि शिवसेनेतील काही नेत्यांकडून सुरू झाला आहे. पाणीपुरवठा होत नाही, रस्ते खराब आहेत, पथदिवे बंद आहे, अनेक योजना रखडल्या आहेत. त्याचे प्रतिबिंब माध्यमातून उमटणारच. माध्यमांनी मनपाच्या कृष्णकृत्यांची दखल घेताच खा. चंद्रकांत खैरे यांना राग येतो. त्यापेक्षा जास्तीचा राग मनपातील काही अधिकाऱ्यांना येतो. जनतेला न्याय मिळण्याची अपेक्षा फक्त माध्यमांकडून राहिली आहे. माध्यम प्रतिनिधींना धमकावणे, नोटीस देण्याची भाषा करून बघून घेण्याचा इशारा देणे. इथपर्यंत काही शिवसेना नेत्यांची मजल गेली आहे. जनतेला पाणी मिळत नाही. खराब रस्त्याने कंबरडे मोडले आहे. म्हणून जनतेला राग येतो. भाजप वरचढपणा करते म्हणून सेनेला राग येतो. हे साहजिकच आहे पण ‘प्रकाश महाजन को गुस्सा क्यूँ आता है?’ ल्लल्लल्ल
प्रकाश महाजन को गुस्सा क्यों आता है?
By admin | Updated: January 4, 2015 01:14 IST