शैलेंद्र कृष्णराव भोपे (४८, रा.गजानननगर) असे आरोपी लिपिकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांच्या बोरमाळ तांडा (ता.सोयगांव) येथे आदिवासी वस्ती आहे. या वस्तीसाठी मंजूर मंगल कार्यालयाच्या बांधकामाचा उर्वरित तीन लाखांचा धनादेश मिळावा, यासाठी तक्रारदार भोपे याला जाऊन भेटले. यावेळी भोपे याने हा धनादेश अदा करण्यासाठी १५ हजार रुपये लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. यानंतर, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदारासोबत सोमवारी सायंकाळी दोन पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी आरोपी भोपे याने तडजोड करीत १० हजार रुपये लाच घेण्याची तयारी दर्शविली. भोपे याने रात्री ७ वाजण्याच्या सुमारास लाचेची रक्कम घेऊन उल्कानगरी येथील चेतक घोडा चौकात येण्यास सांगितले. यानंतर, पोलिसांनी तेथे सापळा रचून भोपेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत वारे, संदीप राजपूत, हवालदार बाळासाहेब राठोड, केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागुल यांनी केली.
१० हजार रुपये लाच घेताना आदिवासी विकास प्रकल्पाचा कनिष्ठ लिपिक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:05 IST